आंबोली (चंद्रपूर) : पुयारदंडच्या शिवेला लागून असलेल्या भिसी शेतशिवारात मातोश्री वृद्धाश्रमाला लागून असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट मृतावस्थेत आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.या घटनेची माहिती ब्रह्मपुरीचे उपवनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर, क्षेत्र सहायक भिसी यांना मिळताच वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. भिसी पुयारदंड सीमेला लागून असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमाजवळ पुयारदंड येथील रमेश गवळी यांची मालकी असलेली धानाची शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये धान पिकाची लागवड केली आहे. मजूर धान पिकाची कापणी करीत असताना बिबट मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वीच झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सदर बिबट्याचा मृत्यू विद्युत तारांच्या प्रवाहाने झाला असावा, असे काहींचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
शेतात बिबट मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 03:45 IST