पनवेल : कर्नाळा टीव्हीच्या सहसंपादिका चेतना वावेकर यांच्यावर शुक्रवारी सकाळी ९.३०च्या सुमारास आकुर्ली गावानजीक दोघा व्यक्तींनी हल्ला केला. क्षुल्लक कारणावरून चेतना व त्यांचा भाऊ तुषार यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली. राजेश ठाकूर व चंद्रकांत पाटील अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही आकुर्ली गावचे रहिवासी असल्याचे समजते. चेतना व तुषार हे दोघे त्यांच्या चिपळे येथील नवीन घरी दुरुस्तीचे काम करण्यासाठी कारपेंटर घेऊन चालले होते. तेव्हा आकुर्ली स्टॉपजवळ हे हल्लेखोर त्यांच्या गाडीसमोर अचानकपणे आले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. या वेळी राजेश आणि चंद्रकांत यांनी चेतना व तुषार यांना जबर मारहाण केली. राजेश ठाकूर व चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्याचे वृत्त समजताच पनवेलच्या पत्रकारांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली व या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी स.पो.नि. जे.एच. थोरात यांच्याकडे केली. चेतना वावेकर व तुषार हे सध्या म्हात्रे रुग्णालयात दाखल आहेत. चेतना यांच्या डाव्या हाताचे हाड तुटले असून, त्यांच्या डोक्याला व पायाला प्रचंड मार लागला आहे. (वार्ताहर)
महिला पत्रकाराला मारहाण
By admin | Updated: November 8, 2014 04:12 IST