मुंबई : नियमांची पायमल्ली केल्यामुळे पुणे आणि नागपूर भागांतून तब्बल साडेतेरा लाख रुपयाच्या किमतीचा सिगारेट पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला आहे.लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये सिगारेट ओढण्याच्या प्रमाणात वाढ होते आहे. तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे. तरीही सकारात्मक बदल दिसत नसल्यामुळे स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या ‘जाहिरातीचा प्रतिनिषेध’ अथवा व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, वितरण व विक्री विनियम, अधिनियम २००३ च्या कलम ३४ प्रमाणे हा नियम करण्यात आला असल्याचे एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. पुण्यातील दोन आणि नागपूर येथील तीन अशा एकूण पाच व्यावसायिकांकडून, १३ लाख ५७ हजार ५४४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यावर नियमाप्रमाणे चेतावणी नव्हती. ८५ टक्क्यांपैकी ६० टक्के भागावर आरोग्यासंबंधीचे चित्ररूप, तर २५ टक्के भागावर त्याचे शब्दरूप असले पाहिजे. परदेशातून येणाऱ्या सिगारेट पाकिटावरही चेतावणी असणे आवश्यक आहे, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)।जागरूक नागरिकांनी सहकार्य कराजागरूक नागरिकांनी या नियमाचे उल्लंघन होत असल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके, रेल्वे स्थानक, विमानतळ, पोर्ट ट्रस्ट अथवा सरकारी रुग्णालये या परिसरात नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास त्या विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
एफडीएने जप्त केल्या सिगारेट
By admin | Updated: July 31, 2016 04:57 IST