मुंबई : शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या आमदारकीची मुदत मार्चमध्ये संपली. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचा समावेश झाला नाही. खान यांचा बिगर सदस्य मंत्रीपदाचा कार्यकाल गुरुवारी संपुष्टात आल्याने एकतर त्यांना मंत्रीपदापासून मुक्त करा अन्यथा पुन्हा मंत्रीपदाची शपथ द्या, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.रावते यांनी यासंदर्भात गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. ते म्हणाले की, फौजिया खान यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाल १२ मार्च २०१४ रोजी संपला. कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रीपदावर ठेवल्यास संबंधित व्यक्तीला राज्यघटनेतील तरतुदीनुसार सहा महिन्यांच्या आत दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे आहे. विधान परिषद सभापतींच्या निदर्शनास ही बाब आपण आणली होती. आपल्या हरकतीवर सभापतींनी निर्णय राखून ठेवला होता. आता एकतर त्यांना मंत्री पदावरून मुक्त तरी करा किंवा नव्याने शपथ द्या, अशी मागणी रावते यांनी केली.(विशेष प्रतिनिधी)
‘फौजिया यांना मंत्रिपदापासून मुक्त करा’
By admin | Updated: September 12, 2014 02:43 IST