पुणे : एका तरुणीला थेट प्रख्यात अभिनेत्रीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट येते...आणि विचारणा होते की सिनेमात काम करण्याची... ही तरुणी सावध होते...माहिती काढते...तेव्हा हे अकाउंटच बनावट असल्याचे समजते...तर दुसऱ्या घटनेत एक तरुणी दुसऱ्या तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते...मैत्रीची गळ घालते...बोलता बोलता थेट अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात करते...आणि थोड्याच वेळात ती ‘तो’ असल्याचे समजते...अशा एक ना अनेक तरुणींना सध्या महिलांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बनावट अकाउंटद्वारे जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात थेट दोन तरुणींच्या तक्रारी ‘लोकमत’कडे प्राप्त झाल्या आहेत. फेसबुकवर एखादे बनावट अकाउंट काढणे सहज सोपे आहे. केवळ एका ई-मेल पलीकडे कोणत्याही प्रकारची ‘केवायसी’ पाळली जात नाही. त्यामुळे आधी बनावट ई-मेल आणि नंतर बनावट फेसबुक अकाउंट उघण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. तरुणींना आणि महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अनेकदा अशा भुलाव्याला तरुणी बळीही पडतात. अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना किमान त्यामध्ये ‘म्युच्युअल फ्रेंड्स’ कोण आहेत, याची खात्री करण्याची काळजी तरुणींनी घ्यायला हवी. सध्या सोशल मीडियाद्वारे कुठलीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी सहजरीत्या संपर्कात येऊ शकते. अनोळखी व्यक्तींसोबत संपर्क प्रस्थापित करणे सहज शक्य झालेले आहे. पण, याचा धोका अनेकांच्या लक्षात येत नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आणि ती व्यक्ती जर एखादी तरुणी असेल आणि त्यांचा एखादा म्युच्युअल फ्रेंड असेल, तर ती स्वीकारण्याचा धोका अनेक वेळा तरुणी पत्करतात. समोरच्या व्यक्तीकडून अश्लील मेसेजेस आल्यानंतर मुलींना धक्का बसतो. पण, अशा व्यक्तींच्या जाळ्यातही तरुणी नकळतपणे ओढल्या जात आहेत. अनेक जणींची अशाप्रकारे फसवणूक झाल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. अशाच प्रकारे फ्रेंड रिक्वेस्ट आणि अश्लील मेसेज आल्याच्या दोन तक्रारी थेट ‘लोकमत’कडेच प्राप्त झालेल्या आहेत. -फेसबुकवर माझे अकाउंट नाहीफेसबुकवर माझे अकाउंट नसतानाही माझ्या नावाने ३०-४० अकाउंट ओपन करण्यात आली आहेत. या अकाउंटवरून अनेक जणांना मेसेजेस केले जातात, त्याची शहानिशा करण्यासाठी मला फोन येतात. चंद्रपूरला शूटिंग करीत असताना मी सायबर सेलमध्ये तक्रारदेखील नोंदविली. त्या वेळी सांगण्यात आले तुमची फेक अकाउंट बंद केली, तर ती पुन्हा ओपन केली जात आहेत, आम्ही तरी काय करू. - निशिगंधा वाड, अभिनेत्री-मला मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने मी ती स्वीकारली. लगेचच दुसऱ्या क्षणाला हाय म्हणून मेसेज आला, जुनी मैत्रीण असेल म्हणून रिप्लाय दिला, तर चक्क समोरून अश्लील मेसेज वाचायला मिळाल्याने धक्काच बसला, नंबर मागितल्यावर तो मुलगा असल्याचे कळले. - पीडित तरूणी
फेक अकाउंटद्वारे तरुणी जाळ्यात
By admin | Updated: July 4, 2016 01:02 IST