मुंबई : होळीसह आलेल्या सलग सुट्यांमुळे एसटी महामंडळाला २१ ते ३१ मार्च या कालावधीत १२ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झाले आहे. २१ ते ३१ मार्च या ११ दिवसांत कोकणात ये-जा करणारे चाकरमानी आणि २४ ते २७ मार्च अखेर सलग ४ दिवस मिळालेल्या सुटीमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.दहावीसह बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण महामंडळाने नोंदवले आहे. या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत प्रवाशांची सरासरी संख्या अत्यंत कमी म्हणजे ५२ टक्क्यांच्या आसपास होती. मार्च महिन्यात यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो आकडा ५७ टक्क्यांवर पोहोचला. या कालावधीत एसटीच्या सहा प्रादेशिक विभागांपैकी सर्वाधिक उत्पन्न मुंबईने मिळवले आहे. गेल्या आठ दिवसांत दैनंदिन उत्पन्नापेक्षा १ कोटी ३० लाख रुपये वाढीव उत्पन्न मुंबईला प्राप्त झाले आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
एसटीला १२ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:50 IST