मुंबई/ सांगली : राज्यात दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत याविषयीचे सूतोवाच केले. आणखी १२ जणांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. विस्तारामध्ये भाजपाला सहा मंत्रिपदे तर मित्रपक्षांना सहा मंत्रिपदे मिळतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने दोन राज्य मंत्रिपदे रिक्त ठेवलेली आहेत. याचा अर्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल, असे मानले जात आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यात मंत्रिपद स्वीकारावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती; पण ती त्यांनी अमान्य करीत केंद्रात मंत्रिपद मिळण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. राज्यात रिपाइंच्या वाट्याला येऊ पाहणारे मंत्रिपद भाजपाला द्यावे आणि आठवले यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा प्रस्ताव भाजपाकडून येऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)सध्या राज्य मंत्रिमंडळात भाजपाचे २० आणि शिवसेनेचे १० मंत्री आहेत. आपल्या मंत्रिमंडळाचा आकार फार मोठा नसेल, असे फडणवीस यांनी सुरुवातीला म्हटले होते. मात्र पाटील यांचे विधान लक्षात घेता ४२ जणांचे मंत्रिमंडळ असेल, असे मानले जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
By admin | Updated: December 31, 2014 10:00 IST