ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे अंदाज वतर्वणा-या जनमत चाचण्या किंवा एग्झिट पोल्स यंदा खरे ठरले आहेत.
गेल्या दशकभर सत्तेवर असलेल्या काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कारभाराला नागरिक कंटाळले असून त्यांना बदल हवा आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत एनडीए आघाडी तो देण्यास समर्थ आहे, असे सगळीकडे सुचवले जात होते. गल्लीच्या कोप-यापासून ते सोशल मीडियावर अब की बार मोदी सरकार म्हणून घोषा लावला जात होता. आजच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांच्या ट्रेंड्समधून तो खरा असल्याचे सिद्ध होत आहे.
यापूर्वी 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही जनमत चाचण्या हाच अंदाज वर्तवत होत्या. पण त्यावेळी भाजपाचा इंडिया शायनिंगचा नारा खोटा ठरवत काँग्रेसने सत्ता मिळवली होती. त्यामुळे यंदाही या चाचण्यांना फारसे महत्त्व दोऊ नये असे सांगितले जात होते. पण होरा खोटा ठरवत एग्झिट पोलचे अंदाज ब-याच अंशी खरे ठरले आहेत.