मुंबई : पर्यावरणाचे संतुलन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय ‘सृष्टीमित्र’ स्पर्धा पारितोषिक वितरण व पर्यावरण विषयक ‘वसुंधरा लघुचित्रपट’ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन, पर्यावरण विभागाचे संचालक बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले की, ‘२५ वर्षे शासनाची सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना एक वेगळाच आनंद आहे.’ कर्मचाऱ्यांनी महामंडळाची दीर्घ सेवा करून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सेवानिवृत्तीनंतरही सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव सत्कार आणि अभिव्यक्ती सृष्टीमित्र मंडळाच्या पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच २०१५ साली घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. (प्रतिनिधी)>प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचाऱ्यांना लवकरच पेन्शनशासन आणि प्रशासन एकाच रथाची दोन चाके आहेत. शासन आणि प्रशासन यांनी समन्वयाने कार्य केले, तर विकासाचा वेग अधिक गतीने वाढतो. प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचारी दीर्घकालीन शासनाची सेवा करतात, परंतु त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल आणि यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे रामदास कदम यांनी सांगितले.
पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST