लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकांच्या निवडणुका कधी होतील, हे एआयसुद्धा सांगू शकत नाही. आपल्या संविधानात सर्वोच्च न्यायालय हे एआयपेक्षा वरच्या स्थानावर आहे. सर्वोच्च न्यायालय ठरवेल तेव्हा महापालिका निवडणुका होतील. त्या लवकर व्हाव्यात, असे आम्हालाही वाटते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आम्ही त्यापासून वंचित ठेवू शकत नाही. येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालय याबाबत निर्णय घेईल, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील जिओ सेंटरमध्ये ‘मुंबई टेक वीक २०२५’ या आशियातील सर्वांत मोठ्या एआय इव्हेंटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय ॲण्ड पॉलिसी’ या विषयावर आठ हजार जणांच्या उपस्थितीत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली.
यावेळी वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात येत असलेले नवे शहर आणि विदर्भ आणि मराठवाड्यातीलनदीजोड प्रकल्पाचे काम सर्वांत प्राधान्याने केले जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांना कोणाला सांभाळून घेणे अवघड वाटते, ठाणेकरांना की बारामतीकरांना? या प्रश्नावर फडणवीस उत्तरले, तुम्ही हा प्रश्न त्यांनाच विचारायला हवा. मला तर सगळेच चालतात. त्यांना माझ्यासोबत काम करण्याबाबत काय वाटते, हे तेच सांगू शकतात. ठाणेकर वा बारामतीकर, मी दोघांसोबतही काम करू शकतो.
व्हॉट्सॲपवर 'आपले सरकार'च्या ५०० सेवा मिळणारराज्य सरकारकडून सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने "आपले सरकार" पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध करणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी व्हॉट्सअँप चॅटबॉट विकसित केले जाणार आहे.
नवी मुंबई होईल नवे बिझनेस मॅग्नेट शहरवाढवण बंदर जेएनपीटीपेक्षा तिप्पट असेल. त्याने संपूर्ण देशाची आणि मुंबईची अर्थव्यवस्था बदलून जाईल. जगभरातील सर्वांत मोठी जहाजे या बंदरावर येऊ शकतील. नवी मुंबई विमानतळाजवळ उभारले जाणारे नवे शहर नवे बिझनेस मॅग्नेट असेल. त्याचबरोबर वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई आणि मुंबईसाठी तिसरे विमानतळ तयार होईल, असेही फडणवीस म्हणाले.