मनोज भिवगडे, अकोलाजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच पक्ष जातीय समीकरणे सोडविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. कोणता पक्ष कोणत्या जातीचा उमेदवार देतो, याकडे पक्षांचे लक्ष असून, अशा स्थितीत आतापर्यंत एकाही पक्षाला उमेदवाराच्या नावावर अद्याप अंतिम निर्णय घेता आलेला नाही. सर्वच पक्षांमध्ये असलेल्या या गोंधळाच्या स्थितीत, काही विद्यमान आमदारांवरही टांगती तलवार आहे.आकोट मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गावंडे यांच्याविरोधात भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आ. गावंडे यांना उमेदवारी द्यावी अथवा नाही, याबाबत शिवसेनेत गांभिर्याने विचार सुरू आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांनी त्यांचे पुत्र महेश यांच्यासाठी उमेदवारी मागितली असली तरी, दुसरीकडे काँग्रेसमधील अल्पसंख्याक गट आकोट मतसंघावर दावा करीत आहे.अकोला पश्चिम हा मतदारसंघ यावेळी दोन कारणांसाठी चर्चेत आला आहे. भाजपाचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांनी निवडणूक न लढविण्याचा त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळविला असला तरी, दुसरीकडे निवडणूक लढविण्याची तयारीही चालविली आहे. त्यामुळे भाजपाचे इतर इच्छूक उमेदवार संभ्रमात आहेत. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे; पण या पक्षालाही उमेदवारीचा पेच सोडविता आलेला नाही. बाळापूरमध्ये विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना रिंगणात उतरविण्याची तयारी भारिप-बहुजन महासंघाने केली असली तरी, येथे मराठा कार्ड वापरण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस यांना सक्षम उमेदवाराचा पेच सोडविता आलेला नाही. अकोला पूर्वसाठी भाजपाने केलेल्या दाव्याने शिवसेनेचे उमेदवार संभ्रमात आहे. काँग्रेसने आजवर या मतदारसंघात मराठा कार्डच वापरले. यावेळीही तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे, काँग्रेसच्या इच्छुकांच्या यादीवरून स्पष्ट होते. भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार हरिदास भदे यांच्याविरोधात पक्षाचे पाठबळ असलेला मोठा वर्ग असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रमाची स्थिती आहे.मूर्तिजापूरमध्ये एका उमेदवारास पुन्हा संधी न देण्याची परंपरा यावेळीही सर्वच पक्षांकडून जोपासली जाण्याची शक्यता आहे. याला राष्ट्रवादी अपवाद ठरू शकते. भाजपामध्ये आमदार हरिश पिंपळे यांच्याऐवजी पर्यायी सक्षम उमेदवाराच्या नावावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसनेही येथे दावा केला असल्याने आघाडीच्या जागा वाटपाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
जातीय समीकरणे प्रभावी, सर्वत्र गोंधळाचे वातावरण
By admin | Updated: September 12, 2014 02:31 IST