अकोला : गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्याची ओरड काहींनी सुरू केली होती. यावर उपाय म्हणून गोवंशाच्या सेवेसाठी प्राणी रक्षण मंडळांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्पाच्यावतीने आयोजित अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. सरकारने मतांचे राजकारण न करता राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. गोवंश वाचेल तरच शेतकरी आणि समाज वाचणार असल्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गोशाळा आणि गोसेवकांचे जाळे तयार करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. राज्य सरकारच्या निर्णयाला काहींनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला; मात्र उच्च न्यायालयानेदेखील शासन निर्णयाला स्थगिती न देता कायद्याचे समर्थन केले. डॉ. आंबेडकरांनी संविधानात गोवंशाचे रक्षण करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर निश्चित केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या कायद्याचा धर्माशीदेखील संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. ही खेदाची बाब आहे.राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर इंग्रजी मीडियातून सरकारने मांसविक्रीवर निर्बंध घातल्याचे वृत्त झळकत होते. आमचा उद्देश गोवंशाची हत्या रोखण्याचा असताना संबंधित मीडियाची भूमिका असंवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
राज्यात प्राणी रक्षण मंडळाची स्थापना करणार
By admin | Updated: June 5, 2015 01:16 IST