श्रीनिवास नागे, सांगलीजिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळच्या पोटनिवडणुकीत एकीकडे राष्ट्रवादीने दिलेली भावनिक साद आणि प्रचारात उतरवलेली दिग्गजांची फळी तर दुसरीकडे भाजपातील बंडखोरीला पक्षाच्याच एका गटाकडून पद्धतशीरपणे पुरवली जाणारी रसद आणि त्यांनी घराणेशाहीला केलेला विरोध असे चित्र प्रचारात दिसत आहे. त्यातच म्हैसाळ योजनेच्या ‘पेटलेल्या’ पाण्याचा मुद्दा प्रचारात आल्याने रंगत वाढली आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी सुमनताई निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), शेकापने उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपानेही पाटील कुटुंबीयांविरोधात लढणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र दरम्यानच्या काळात आबांचे कट्टर विरोधक असलेले भाजपाचे खा. संजय पाटील आणि माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांचे पक्षाच्या वरिष्ठांवर दबाव टाकण्याचा आणि कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पक्षनिर्णय मान्य करत घोरपडे यांनी स्वत: न उतरता स्वप्निल पाटील यांना अपक्ष म्हणून उभे केले. त्यातून घराणेशाहीच्या विरोधाचा मुद्दा प्रचारात आला आहे.राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच भावनिक हाक देत निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवरच लढण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीने दिग्गजांची फळी प्रचारात उतरवली आहे. शिवाय जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनीही पायाला भिंगरी बांधली आहे. आबांचे कुटुंबीय घराघरात जाऊन प्रचार करत आहेत. आबांचे दुष्काळी भागाचे नंदनवन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमनतार्इंना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी करत आहे. ९ एप्रिलला प्रचार संपेल. ११ एप्रिलला मतदान, तर १५ एप्रिलला मतमोजणी आहे. त्यावेळी भाजपाच्या बंडखोराला मिळालेल्या मतांवरून बंडामागील खेळीचे खरे सूत्रधार उघड होतील.
सहानुभूतीची लाट, घराणेशाहीला विरोध!
By admin | Updated: April 9, 2015 01:25 IST