मुंबई : वरळी परिसरात राहत असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि तिच्या व्यावसायिक पतीविरुद्ध गुरुवारी ५० लाखांच्या वीजचोरीचा गुन्हा दाखल झाल्याने सिनेजगतात एकच खळबळ उडाली आहे. रती वरळी येथील स्टर्लिंग सोसायटीत कुटुंबीयांसोबत राहतात. गुरुवारी बेस्टच्या दक्षता समितीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत त्या चोरीची वीज वापरत असल्याचे समजले. बेस्टच्या दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा टाकला. आतापर्यंत जवळपास ५० लाखांची वीज त्यांनी वापरल्याचा संशय असल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी दिली. त्यानुसार दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून रती आणि त्यांच्या पतीविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली. (प्रतिनिधी)
रती अग्निहोत्रीविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा; बेस्टची कारवाई
By admin | Updated: January 20, 2017 05:09 IST