Prithviraj Chavan vs PM Modi: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली. पण मोदींवर कारवाई केलेली नाही. हा प्रकार २०२०मधला आहे. याआधी जेव्हा असे घडले होते, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हे दाखवून देण्यात आले होते. मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही? याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज ठणकावून सांगितले. टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अधिक माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २८ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका व पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत्या. हा कार्यक्रम देशभर टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता सुरुवातीला वेळकाढूपणा करण्यात आला पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली. या प्रकरणी सरळ सरळ कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला आहे हे स्पष्ट दिसत असतानाही नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही.
या प्रकरणी तक्रार करणारे प्रफुल्ल कदम यांनी आचारसंहिता भंग कशी झाली, याची माहिती सर्व नियम व कायद्यानुसार दिली. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असून आदर्श आचारसंहितेचा उघडपणे भंग केलेला असल्याने नरेंद्र मोदी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.