आठवलेंना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रतीक्षा करा’जमीर काझी : मुंबईमुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रमुख दावेदार असलेल्या शिवसेना व भाजपामध्ये अद्याप युतीबाबत अनिश्चितता आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) मात्र आपली प्राथमिक भूमिका भाजपा श्रेष्ठींकडे मांडली आहे. भाजपा स्वतंत्रपणे लढणार असल्यास किमान २८ व सेनेसमवेत रिंगणात उतरण्याचे झाल्यास किमान १५ जागा देण्यात याव्यात, असा प्रस्ताव आरपीआयने बनविला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. मात्र तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ‘प्रतीक्षा करा’ असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आठवले गटाने भाजपाची शिवसेनेबरोबर युती न झाल्यास देखील भाजपासमवेत कायम राहणार असल्याची भूमिका यापूर्वीच घेतली आहे. सध्याच्या सभागृहात रिपाईचा एक नगरसेवक आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वर्चस्वासाठी सत्तारुढ भाजपा व सेनेतच जोरदार चढाओढ आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांच्या सभागृहात ५० ते ५५ ठिकाणी दलित मते निर्णायक आहेत. त्यामुळे आरपीआयच्या विविध गटा-तटांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आठवले गटाचे महत्त्व निश्चितच अधिक आहे. ....................................‘आरपीआय’ला नको भाजपाचे चिन्ह रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) हा भाजपासोबत युतीत असला तरी स्वतंत्र अस्तित्त्व असणारा पक्ष आहे. रिपाइंला सुद्धा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांना भाजपचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर सावध झालेल्या रिपाइं (ए ) ने असे प्रकार पुन्हा घडू नयेत, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे पाटील यांना दिल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, तानसेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर. डी. एम. चव्हाण आदींची उपस्थिती होती. यापुढील निवडणुकांमध्ये रिपाइं उमेदवारांसमोर भाजपाचे बंडखोर उमेदवार उभे राहू नयेत, बंडखोरांना भाजपने निवडणूक चिन्ह आणि एबी फॉर्म देऊ नये, असेही पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.....................................
आठवलेंना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रतीक्षा करा’
By admin | Updated: January 23, 2017 19:23 IST