भिवंडी : तालुक्यातील रहानाळ गावातील मढवी कम्पाउंडमध्ये भंगाराने भरलेल्या पत्र्याच्या गोदामास शनिवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास आग लागून गाढ झोपेतील आठ कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबतीचे तीन कामगार गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सायन आणि भिवंडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरात नारपोली पोलीस ठाण्यातील बीटमार्शल लक्ष्मण सहारे व बापू दगा गजरे हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना रहानाळ गावात धूर दिसला. त्या दिशेने गेल्यानंतर त्यांना भाजलेल्या अवस्थेतील तीन जखमी कामगार पळताना आढळले. त्यांनी लगेच अगिनशमन दलाला ही घटना कळवली. ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना नऊ तासांहून अधिक वेळ लागला. आगीत लाकडी फळ्या, प्लास्टीकचे सामान व इतर भंगार जमा असलेली तीन गोदामे जळून खाक झाली. गोदामांत फायबर व लाकडी फ्रेम होत्या. नेहमीप्रमाणे फ्रेमवर गाढ झोपलेल्या आठ कामगारांचा अक्षरश: कोळसा झाला. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून मनवर अली जंगबहादूर खान, इश्तियाक अहमद उस्मान अली सलीम अन्सारी व शौकत अली उस्मान अन्सारी यांना अटक केली आहे. जमीनमालक राजेंद्र मढवी फरार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी दिली. (प्रतिनिधी) महिना दोन हजार भाडेएमजे ट्रेडर्स आणि एसयू एंटरप्रायजेस या नावाने या ठिकाणी फ्रीजला लागणाऱ्या लाकडी चौकटी बनविण्याचे काम करण्यात येत होते. दोन गाळ्यांमध्ये लाकडी तर एका गाळ्यात प्लास्टीकचे भंगार होते. २ हजार रुपये भाड्याने हे गाळे घेण्यात आले होते.मृत : रामदयाल उर्फ अजय राजभर, राजू चव्हाण, गौरी चव्हाण, कलिया हरिजन, मुनिलाल यादव, मुरारी मौर्या, नीरज कुर्मी (रा. कपिलवस्तू, नेपाळ) व तिलकराम राजभर (रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश).जखमी : विनोद यादव (२१), विजय उर्फ बहादूर चव्हाण (१८) व घिर्रे चव्हाण (२१).
आठ कामगारांचा होरपळून मृत्यू
By admin | Updated: December 28, 2014 02:28 IST