ठाणे : शिक्षक दिनानिमित्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, विशेष शिक्षक व स्काउट-गाइड आदी आठ शिक्षकांची राज्य शिक्षक आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जिल्हा शिक्षक आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे मात्र ठाणे जिल्हा परिषदेने अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. परंतु, प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे बोलले जात आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०१५-१६ या वर्षाच्या राज्य शिक्षक आदर्श पुरस्कारासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील प्रत्येकी चार शिक्षकांची निवड झाली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील वळ येथील जि.प. शाळेतील संतोष सोनवणे यांची राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली. याशिवाय, वासिंद येथील माध्यमिक शिक्षक काळुराम धनगर, आदिवासी विभागातील जि.प. शाळा शिरगाव, ता. शहापूर येथील प्राथमिक शिक्षक केशव शेलवले आणि अंबरनाथ येथील शास्त्री हिंदी विद्यालयाचे सतीश कोल्हे यांची स्काउट-गाइडचे राज्य शिक्षक आदर्श पुरस्कार म्हणून निवड झाली आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चंडीगाव येथील जि.प. शाळेच्या प्राथमिक शिक्षिका सुलोचना पाटील यांची राज्य शिक्षक आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली. याप्रमाणेच पालघर येथील श्री स.तु. कदम विद्यालयाचे गणेश प्र्रधान, डहाणू तालुक्यातील बोरीवाडा जि.प. शाळेच्या प्रतिभा कदम, तर पालघरच्या विराथन येथील अभिनव विद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रमोद पाटील यांची विशेष शिक्षक क्षेत्रातील राज्य शिक्षक आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली आहे.गणेश चतुर्थीमुळे हा पुरस्कार वितरण सोहळा काही दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. याप्रमाणेच जिल्हा परिषदेतर्फेदेखील प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची जिल्हा शिक्षक आदर्श पुरस्कारासाठी निवड केली आहे. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागाने ही नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहेत. तत्पूर्वी काही दिवस आधी या जिल्हा शिक्षक आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांची घोषणा केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
ठाणे-पालघर जिल्ह्यांतील आठ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार
By admin | Updated: September 5, 2016 04:39 IST