अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
नेते हो, नमस्कार...गावागावांत प्रत्येक जण, गॅस सिलिंडर कधी मिळणार? रॉकेल कधी देणार? हॉटेलमधले पदार्थ कमी का करायचे? खाद्यपदार्थांचे दर कमी कधी होणार? आम्ही खायचे तरी काय? असे प्रश्न तुम्हाला विचारतील. चिंता करू नका. त्यासाठीचे काही ठोस उपाय इथे देत आहे. आज रविवार आहे. आजचा दिवस आपल्या मतदारसंघात घालवा. येणाऱ्या प्रत्येकाला इथे दिलेली उत्तरे ऐकवा... आणि पुढचे काही दिवस मतदारसंघात जाऊच नका... कोणी काही विचारले तर अधिवेशन आहे, असे सांगा. मुंबईत राहून अधिवेशनात बसलेच पाहिजे, असे बंधन नाही. विरोधी पक्ष सभागृहात बोलत नाही... आपण तर सत्तापक्षात आहोत. त्यामुळे आपल्याला बोलायची गरज नाही. गावाकडेही जायची गरज नाही. जिवाची मुंबई करा. फार वाटले तर अधिवेशनाच्या नावाखाली एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन या... कार्यकर्त्यांनी, मतदारांनी काही विचारलेच तर त्यांना काय सांगायचे? असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. म्हणूनच हे पत्र.
त्यांना सांगा, तळलेले पदार्थ खाणे चांगले नसते. हल्ली तेलकट पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते. कोलेस्ट्रॉल वाढले की, हृदयावर ताण येतो. ताण आला की हार्ट अटॅक येतो... तसे झाले तर दवाखान्याचा खर्च वाढतो. हॉटेलचे पदार्थ खाऊ नका. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, असे त्यांना आवर्जून सांगा. बाहेरचे पदार्थ कोणत्या तेलात तळलेले असतात माहिती नाही. उगाच नको ते आजार घेण्यापेक्षा फुटपाथ वरचे खाणे बंद करा, असे त्यांना आवर्जून सांगा. त्यातून दोन फायदे होतील. हॉटेलवाले गॅसवरून जी बोंबाबोंब करत आहे ती कमी होईल आणि फुटपाथवरचे पदार्थ खायला कोणी आलेच नाही की, फुटपाथ वरचे अतिक्रमण देखील ऑटोमॅटिक कमी होईल... आहे की नाही आमचा जबरदस्त उपाय...
मतदार म्हणतील मग आम्ही खायचे तरी काय..? तेव्हा त्यांना सांगा, आता ‘रॉ फूड’ खायला शिका... काकडी, गाजर, मुळा यांचे सॅलेड खा... मूग, मटकी, हरभरा, चवळी, काबुली चणे पाण्यात भिजवा... त्याला मोड आणा... आणि मोड आलेले धान्य खा... त्यामुळे तब्येत ठणठणीत राहील. हिरव्या भाज्या तिखट, मीठ लावून खा... पालक, मेथी, पातीचा कांदा अशा गोष्टी खाल्ल्यामुळे फायबर मिळते असे सांगा... सफरचंद, केळी, पेरू, मोसंबी, संत्री, पपई अशी फळे खा... आपले पूर्वज कंदमुळं खाल्ल्यामुळे ठणठणीत होते हे त्यांना आवर्जून सांगा. तुम्हालाही तसेच ठणठणीत राहायचे असेल तर ‘रॉ फूड’ आवश्यक असल्याचे पटवून द्या. अन्नपदार्थ शिजवून खाण्याचे प्रकार काँग्रेसच्या काळात वाढले. काँग्रेसवाल्यांना कोणतीही गोष्ट शिजवून, थंड करून खायची सवय होती. ती सवय मोडण्याची हीच ती वेळ आहे, हे लक्षात घ्या...
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असे केल्यामुळे महिन्याकाठी तुमचे दोन गॅस सिलिंडर वाचतील. म्हणजे थेट २ हजार रुपये वाचतील. शिवाय रॉकेल, विद्युत शेगडी यांचा वापर कमी झाला तर त्यातून तुमचे दोन ते अडीच हजार रुपये वाचतील. कल्पना करा, दर महिन्याला तुमचे ५ हजार रुपये वाचले तर वर्षाचे ६० हजार होतील. एकदा का शरीराला कच्चे अन्न खाण्याची सवय लागली की, पुढची दहा वर्षे ती टिकवता येईल. म्हणजे १० वर्षांत तब्बल ६ लाख रुपये वाचतील. हा हिशेब त्यांना समजावून सांगा... ही बचत तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल... शिवाय या १० वर्षांच्या काळात तुमच्या पोराबाळांना कच्चे अन्न खायची सवय लागली की, त्यांची देखील बचत होत जाईल. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ तसेच लाखो रुपये काही वर्षांत वाचतील. गॅस सिलिंडरसाठी रांगा लावणारे सगळे आपल्या देशाला बदनाम करण्यासाठी रांगेत उभे आहेत, हे सांगायला विसरू नका. एकदा का हे तुम्ही लोकांना नीट समजावून सांगितले की, लोक एकदम फिट व्हायला लागतील. जगात जे काही सुरू आहे ते महिन्याभरात थांबेल. तोपर्यंत अधिवेशन, उन्हाळा या गोष्टीही संपतील. नंतर पावसाळा सुरू होईल. लोक पावसाची गाणी गात, कविता म्हणत आनंदात राहतील. तुम्हालाही ताठ मानेने मतदारसंघात जायला मोकळीक मिळेल. या पद्धतीने वागा... मग बघा मतदार तुम्हाला कसे डोक्यावर घेऊन नाचतील... त्यावेळी मात्र आमची आवर्जून आठवण ठेवा. आम्ही दिलेला सल्ला लाखमोलाचा होता, हे तुम्हाला त्या दिवशी कळेल. असो; हे सगळे आम्ही तुमच्या काळजीपोटी सांगितले आहे. बाकी मजेत आहात ना... - तुमचाच, बाबूराव
Web Summary : Politicians are advised to promote raw foods like salads and sprouts. This saves money, reduces reliance on gas, and keeps voters healthy. Encourage citizens to adopt this lifestyle and avoid cooked food habits to reduce household expenses and promote well-being. This will lead to healthier communities.
Web Summary : नेताओं को सलाह दी जाती है कि वे सलाद और अंकुरित अनाज जैसे कच्चे खाद्य पदार्थों को बढ़ावा दें। इससे पैसे की बचत होती है, गैस पर निर्भरता कम होती है और मतदाता स्वस्थ रहते हैं। नागरिकों को इस जीवनशैली को अपनाने और पके हुए भोजन की आदतों से बचने के लिए प्रोत्साहित करें ताकि घरेलू खर्च कम हो और कल्याण को बढ़ावा मिले। इससे स्वस्थ समुदाय बनेंगे।