दीपक पवार - तांबवे --वसंतगड, ता. कऱ्हाड येथे गडाच्या पायथ्याशी कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ टायरपासून चक्क बंधारा बांधला आहे.वसंतगड, ता. कऱ्हाड येथे कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५० विद्यार्थी-विद्यार्थींनींनी सहभाग घेतला होता. या सात दिवसांच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गाड्यांचे टायर गोळा केले. ११० टायरपासून बंधारा उभा करून नवीन उपक्रम राबविला. बंधाऱ्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. एक बंधारा बांधण्यासाठी दोन ते चार लाख रूपये खर्च होतो. परंतू हा टायर पासून बांधलेला बंधारा या खर्चाच्या २० टक्के कमी खर्चात व टिकाऊ स्वरूपाचा होत आहे, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. टायरपासून बनविलेला हा बंधारा कुतुहलाचा विषय झाला आहे. प्रथमत: मुलांनी बंधाऱ्याची जागा निवडली. त्यानंतर गावातून व इतर ठिकाणाहून त्यांनी ११० टाकाऊ टायर जमा केले. सोबत ३७ पोती सिमेंट, १.५ ब्रास वाळू, २.२५ ब्रास खडी, ८ एम. एम. जाडीची १०० कि. ग्रॅम सळई हे साहित्य विद्यार्थ्यांनी वसंतगडच्या ग्रामस्थांकडून जमा करून घेतले. या टायर बंधाऱ्यास साधारणता: ४० ते ४५ हजार रूपये खर्च आला आहे. विद्यार्थ्यांनी सात दिवस श्रमदान करून हा बंधारा उभा केला आहे. बंधाऱ्यासाठी सेवायोजनेचे प्रमुख प्रा. उमेश देशपांडे, प्रा. उमा पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. पी. एम. खोडके, प्रा. डॉ. पी. एम. जोशी, प्रा. डॉ. एम. एस. हेडापू, प्रशासकीय अधिकारी एस. एन. पाटील यांचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्यावतीने रघुनाथ नलवडे, अॅड. अमित नलवडे यांचेही सहकार्य मिळाले. ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटणार...पावसाळ्यात वसंतगड डोंगरावरून मोठ्या प्रमाणावरून पाणी वाहून येते. हे पाणी अडविण्यात येत नसल्याने पूर्वी वाया जात होते. मात्र, विद्यार्थ्यांनी डोंगराच्या पायथ्यालाच बंधारा बांधल्याने यावर्षीपासून डोंगरावरून वाहून येणारे पाणी या बंधाऱ्यात साचून राहणार आहे. त्याचा फायदा ग्रामस्थांना होणार असून येथील पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे.
टाकाऊ टायरपासून बांधला टिकाऊ बंधारा--गूड न्यूज
By admin | Updated: June 4, 2015 00:02 IST