मुंबई : रेल्वेच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय झाला; आणि त्यामुळे पास दरात भरमसाठ वाढ होणार असल्याचे समजताच गेल्या दोन दिवसांपासून तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. २५ जूनपासून नवीन दर लागू होणार असल्याने आणि पासांच्या दरात मोठी वाढ झाल्याने अनेक जण सहामाही आणि वार्षिक पास काढण्यास पसंती देत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून यापूर्वी मासिक आणि त्रैमासिक पासच दिले जात होते. २0१३च्या एप्रिलपासून नव्याने सहामाही आणि वार्षिक पास योजना रेल्वेकडून सुरू करण्यात आली. सहा महिन्यांच्या पासाचा लाभ प्रवाशांना देताना एका महिन्याच्या पासावर ५.४ पट आकारून हा लाभ दिला जाणार आहे. वार्षिक पासाचा लाभ देताना एका महिन्याच्या पासावर १0.८ पट आकारून हा लाभ प्रवाशांना देण्यास सुरुवात केली. या योजनेमुळे प्रवाशांच्या पैशाची बचत होणार असल्यानेच ही पास योजना रेल्वेकडून सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे मासिक किंवा त्रैमासिक पासाची मुदत संपल्यावर पुन्हा पास काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर लावण्यात येणाऱ्या रांगेतून प्रवाशांची सुटका यामुळे होईल, असा दावा रेल्वेने केला. ही पास योजना सुरू होताच रेल्वे प्रवाशांकडून बऱ्यापैकी त्याचा लाभ घेण्यास सुरुवातही झाली. आता झालेल्या भाडेवाढीच्या निर्णयामुळे सहामाही आणि वार्षिक पासलाच चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. २५ जूनपासून नवीन भाडेवाढ लागू होणार असल्याने तत्पूर्वीच अनेकांनी जुन्या दराचे पास काढण्यासाठी खिडक्यांवर रांगा लावण्यास सुरुवात केली. मात्र मध्य रेल्वेने भाडेवाढ २५ जूनपासून लागू होणार असताना, आधीच पासातील फरकाची रक्कम वसूल करण्यास सुरुवात केल्यामुळे रविवारी गोंधळ उडाला. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केल्याने रेल्वेने निर्णय त्वरित मागे घेतला. एका मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाने सांगितले की, अनेक स्थानकांवर पास काढण्यासाठी गेले दोन दिवस गर्दी होत आहे. सहामाही आणि वार्षिक पासची विचारणा काही प्रवासी करतात; तर काही प्रवासी हेच पास काढत आहेत. (प्रतिनिधी)
रेल्वे भाडेवाढीच्या भीतीने तिकीट खिडक्यांवर प्रचंड गर्दी !
By admin | Updated: June 23, 2014 03:20 IST