ऑनलाइन लोकमतबीड, दि. 16 - धारुर तालुक्यातील चोरंबा येथील मायलेकीच्या दुहेरी हत्याकांड आणि बलात्कारप्रकरणी आरोपी कृष्णा रामराव रिडडे व अच्युत ऊर्फ बाप्पा ऊर्फ बाबू कचरू चुंचे (रा. चोरंबा) या दोघांना माजलगाव येथील सत्र न्यायाधीश एम.व्ही. मोराळे यांनी दोषी करार दिला असून, त्यांना उद्या बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. चोरंबा येथे 28 मे 2015 रोजी 45 वर्षीय महिलेचा गळा दाबून खुन केला व तिची अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचाही गळा दाबुन निर्घुणपणे खुन केल्याची घटना घडली होती प्रकरणी दिनांक 29 रोजी धारुर पोलीसांत कलम 449 , 354 ब , 376(2)(आय) , 302 सह कलम 34 भादंवि व कलम 4 बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात माजलगांव येथील जिल्हा सत्र न्यायाधिश एम.व्ही. मोराळे यांच्या न्यायालयात आरोपितांविरध्द दोषारोप पत्र दाखल झाले होते. हा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवुन दिनांक 16 आॅगस्ट रोजी वरील दोन्ही आरोपींविरुध्दचे आरोप सबळ पुराव्यानिशी सिध्द झाले असुन आरोपीतांना मा. न्यायालयाने शिक्षेबददल विचारले असता त्यांच्या वकीलाने शिक्षेबाबत सांगण्यासाठी एक दिवसाचा कालावधी मागुन घेतल्याने आरोपीतांना शिक्षा देतांना त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली व दिनांक 17 आॅगस्ट रोजी यावर शिक्षा सुनावली जाणार असुन न्यायालय या आरोपीतांना कोणती शिक्षा सुनावते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणी सहाययक सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले त्यांना अॅड. बी.एस. राख, अॅड. आर.ए. वाघमारे यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान माजलगांव न्यायालयात आज दिवसभर मोठया प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती त्यामुळे मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीविरोधात दोषारोप सिद्ध
By admin | Updated: August 16, 2016 21:12 IST