मुंबई : दोहाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाला कर्मचारीच उपलब्ध नसल्याने उड्डाण करण्यास १८ तासांचा विलंब झाल्याची घटना घडली. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप झाला. विमानात कर्मचारीच नसल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. शनिवारी पहाटे ३.५५च्या सुमारास येथून दोहाला जाण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान सज्ज झाले होते. या विमानातून ६९ प्रवासी प्रवास करणार होते. मात्र ३.५५च्या सुमारास निघणारे हे विमान काही तास निघून गेल्यावरही उड्डाणास सज्ज झाले नाही. याबाबत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानातील कर्मचारी नसल्याने हा प्रसंग ओढावला. त्यामुळे दुसरे कर्मचारी उपलब्ध करण्यात आले. विमानाला झालेला विलंब पाहता रविवारी सकाळी १0.४४च्या सुमारास विमानाने उड्डाण केले. यातील १० प्रवाशांनी दुसऱ्या विमानाने जाणे पसंत केले; तर अन्य प्रवासी याच विमानाने पुढे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कर्मचा-यांअभावी विमानाचे उड्डाण १८ तास रखडले
By admin | Updated: July 14, 2014 03:11 IST