मुंबई : मुलुंड पूर्वेकडील नवघर रोडवरील धूळ स्थानिकांबरोबर पोलिसांनाही त्रासदायक ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र ही त्रासदायक ‘धुळवड’ रोखण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुलुंड पूर्वेकडे प्रचंड प्रमाणात बांधकामांच्या साईट्स सरू आहेत. म्हाडा कॉलनीतून नवघर मार्गापर्यंतच्या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी लागणाऱ्या मालवाहू वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. परिसरातील दम्याच्या रुग्णांना या धुळीचा मोठा फटका बसत आहे. शिवाय सरदी-खोकल्यासारख्या संसर्गजन्य रोगांसाठीही ही धूळ मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांसह डॉक्टरांचेही म्हणणे आहे. रस्त्यांंच्या दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिकांबरोबरच बच्चे कंपनीलाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या धुळीचा सर्वाधिक फटका मुलुंड नवघर पोलिसांना बसत आहे. याच धुळीतून वाट काढत पोलिसांना काम करावे लागत आहे. या परिसरातून ये-जा करताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. मात्र याबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक जनार्दन महाडिक यांनी केला. (प्रतिनिधी)
धुळीने स्थानिकांबरोबर पोलीसही झाले हैराण
By admin | Updated: December 29, 2014 05:45 IST