लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर दारूविक्री बंद होऊन एक महिना उलटला असला तरी महामार्गावर अनेक ठिकाणी अजूनही दारूविक्री सुरू असल्याची नागरिक तक्रार करीत आहेत. ही अवैध दारूविक्री करण्यासाठी व्यावसायिक नवनव्या युक्त्या वापरत आहेत.मावळात अनेक हॉटेल व ढाबे जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असून या व्यवसायात अनेकांनी आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. हा तेजीत चालणारा धंदा पाहून अनेक धनिक व प्रतिष्ठितांनीही या धंद्यात उड्या मारल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन यांच्याशी हातमिळवणी करून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या या गोरखधंद्यावर अंतराच्या मर्यादेचे संकट आल्याने अनेकांचे धाबे दणाणले. पण, याचा वेगळाच परिणाम झाला. अनेक बिअरबार व वाईन शॉप बंद झाल्याने अवैधपणे सुरू असलेल्या दारूविक्रीत जास्तच वाढ झाली. जास्त दराने दारूविक्री होत असल्याने कमाईतही मोठी वाढ झाली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत २० हजार लोकसंख्या असलेल्या गावांच्या हद्दीत महामार्गापासून २०० मीटर अंतरावर आणि २० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही मर्यादा ५०० मीटर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. अनेक बिअरबार, वाईन शॉप व परमिटरूम बंद झाले. दारू लपविण्याच्या व विक्रीच्या नवीन युक्त्याद्वारे तळीरामांची सोय केली जात आहे. अनेक हॉटेल व ढाबा व्यावसायिकांनी हॉटेलच्या मागील बाजूला मदिरापानाची सोय केली आहे. दारूविक्री परवानाधारक हॉटेल चालकांनी ठरलेल्या अंतराप्रमाणे हॉटेलच्या मागे नवीन बांधकामे सुरू केली आहेत. हॉटेल व ढाब्यावर मदिरापानास मनाई केली जात असली तरी हॉटेलच्या मागील बाजूला किंवा झाडाखाली तळीरामांची सोय केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे.
ढाब्यामागे काही अंतरावर होते मद्यपान
By admin | Updated: May 7, 2017 02:43 IST