गुलजार यांची साद : गुलजार आणि गालिबची शायरी कॅनव्हासवरमुंबई : ‘सपनोंको सरहद नहीं होती और आँखो कों व्हिसा नहीं लगता’, अशा शब्दांत गीतकार गुलजार यांनी भारत-पाक संबंधांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बुधवारी गालिब आणि गुलजार यांच्या शायरीला कॅनव्हासवर उमटवणाऱ्या पाक कलावंत शाहिद रसम यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात गुलजार बोलत होते.शायरीला कॅनव्हासवर चित्रबद्ध करण्याच्या या अनोख्या प्रयोगाचे गुलजार यांनी कौतुक केले. यावेळी गुलजार म्हणाले, की कला आणि संस्कृती हवेप्रमाणे आहेत. त्यांना सीमा नसते. त्यामुळे त्यांना कोणीही अडवून ठेवू शकत नाही. हवेप्रमाणे कला जगभर वाहत असते. गालिब हे भारतीय संस्कृतीचे एक अंग असून, मी स्वत: त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गालिब यांना भारत-पाक या देशांपुरते मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, रसम यांनी गालिब आणि गुलजार यांच्या ज्या शायरी चित्रबद्ध केल्या आहेत, त्या गुलजार यांनी स्वत:च्या आवाजात ऐकवल्या.या वेळी उपस्थित रसम यांनी गुलजार यांनी ऐकवलेल्या शायरी आणि त्यावर रेखाटलेल्या चित्रांचे अर्थ उलगडून सांगितले. गालिब आणि गुलजार यांच्या शायरी चित्ररूपाने जगभर पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा महत्त्वाच्या शहरांनंतर इंग्लंड, पॅरिस आणि दुबईसह जगभरात चित्रप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मात्र प्रदर्शन भरवताना सीमा आणि व्हिसा यांचा अडसर येण्याची शक्यताही त्यांनी या वेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
‘सपनोंको सरहद नहीं होती!’
By admin | Updated: February 5, 2015 01:32 IST