मुंबई : वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात म्हाडाच्या घरांसाठीच्या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आणि म्हाडाच्या घरांसाठी पात्र ठरलेल्या १ लाख २५ हजार ८८४ अर्जदारांपैकी १ हजार ६३ अर्जदारांचे स्वत:च्या हक्काच्या घरांचे स्वप्न रविवारी साकार झाले.म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी रंगशारदा सभागृहासह बाहेरील मंडपात पात्र अर्जदारांची झुंबड उडाली होती. सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत काढण्यात आलेल्या लॉटरीदरम्यान आपल्याला घर लागते की नाही? हे पाहण्यासाठी घरातल्या कर्त्या पुरुषासह महिलाही हजर होत्या. सभागृहासह बाहेरील मंडपात पात्र अर्जदारांना लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे म्हणून छोटे एलसीडी बसविण्यात आले होते. जेवढी गर्दी सभागृहात होती; तेवढीच गर्दी मंडपातदेखील होती.सकाळी १० वाजल्यापासून सायन, मुलुंड, मालाड-मालवणी, गोरेगाव येथील घरांची जसजशी लॉटरी लागत होती; तसतसे पात्र अर्जदार श्वास रोखून आपला नंबर लागतो का? हे डोळ्यांत तेल घालून पाहत होते. घरांच्या विजेत्यांच्या नावांची उद्घोषणा होत असताना सभागृहात ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ असल्याचे चित्र होते. आणि ज्या पात्र अर्जदारांचे घरांचे स्वप्न साकार होत होते; अशांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. तर ज्या पात्र अर्जदारांना घर लागत नव्हते त्यांचे चेहरे मात्र हिरमुसले होते. सभागृहाप्रमाणे बाहेरील मंडपातही हेच चित्र होते. मंडपामध्ये लावण्यात आलेल्या एलसीडीसमोर पात्र अर्जदारांनी ठाण मांडले होते. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत गर्दी वाढत गेली. शिवाय मंडपात विजेत्या अर्जदारांची यादी चिकटविण्यात येत असल्याने ती पाहण्यासाठीही अर्जदारांनी गर्दी केली होती. दरम्यान, ५० टक्के अर्जदारांनी संकेतस्थळावरही लॉटरीचे प्रक्षेपण पाहिल्याचे म्हाडा प्राधिकरणाने प्रसारमाध्यमांना सांगितले. (प्रतिनिधी)
१ हजार ६३ जणांचे घरांचे स्वप्न साकार!
By admin | Updated: June 1, 2015 04:52 IST