ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केले होते ती ऐतिहासिक वास्तू विकत घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. लंडनमधील किंग हॅनरी रोड येथे असलेल्या या घराची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असून यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडेही मंजूरी मागितली आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि अस्पृश्यांच्या न्यायासाठी लढा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९२१ -२२ दरम्यान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत होते. या कालावधीत बाबासाहेबांनी लंडनमधील किंग हेनरी रोड येथील एका घरात वास्तव्य केले होते. या ऐतिहासिक वास्तूची विक्री होणार असून त्यासंदर्भातील जाहिरातही लंडनमधील वृत्तपत्रांमध्ये झळकली होती. हा प्रकार लंडनमध्ये कार्यरत असलेल्या फेडरेशेन ऑफ आंबेडकराईट्स अँड बुद्धिस्ट ऑर्गेनायझेशन (FABU) या संघटनेच्या सदस्यांनी महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून दिला. लंडनमधील लोकांच्या दृष्टीने हे फक्त एक घर असले तरी महाराष्ट्रासाठी ती एक ऐतिहासिक जागा आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती जलसंवर्धन मंत्री नितीन राऊत यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट जगासमोर मांडण्यासाठी नागपूरमध्ये कन्व्हेन्शन सेंटरसाठी सुमारे १३० कोटी रुपयांचा निधी दिला. मग लंडनमधील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घरासाठी ४० कोटी रुपये ही फारच कमी रक्कम आहे. त्यामुळे हे घर विकत घेण्यास राज्य सरकारला कोणतीही आर्थिक अडचण नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही याला मंजूरी दिली आहे. परदेशातील वास्तू असल्याने यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील कधी मिळतो याची राज्य सरकारला प्रतिक्षा आहे. राज्य सरकारने मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांनाही यासंदर्भात पत्र पाठवले आहे.