ठाणे : ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे शासनाचा पैसा लाटण्यासाठी सीआरझेड तीनवर पालिकेने हे उद्यान थाटल्याची माहिती समोर आली आहे. परंतु,याच मुद्यावरुन सोमवारी महासभेत विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा ताबा घेतल्याची माहितीच प्रशासनाला नसल्याची बाबही या निमित्ताने समोर आली. कळव्याला जाताना, खाडीकिनारी हे उद्यान उभारले आहे. सुरवातीला पालिका येथे कचरा टाकत होती. त्यानंतर ही जागा उद्यानात रुपातंरीत करण्यात आली. १४ हेक्टर जागेवर हे उद्यान वसले असून सुरवातीला ऋतुचक्र असे नाव या उद्यानाला दिले होते. परंतु,नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाला डॉ. सलीम अली उद्यान हे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील नाव या उद्यानासाठी निश्चित झाले. परंतु, सीआरझेड तीन बाधीत असलेल्या या जागेवर पालिकेने उद्यान विकसित करुन सुरुवातीला खारफुटीची लागवड केली होती. तसेच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्चही केला. काही वर्षांपूर्वी येथे वृक्ष लागवड व हिरवळीसाठीही लाखोंचा प्रस्ताव पालिकेत वादग्रस्त ठरला होता. ही जागा सीआरझेडने बाधीत असतांना त्यावर एवढा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित करुन याला विरोध झाला होता. परंतु विरोध डावलून पालिकेने हा प्रस्ताव मंजूर केला होता. दरम्यान आजही या उद्यानाचे लोकार्पण झालेले नाही. तसेच, सध्या आतील भागात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. सोमवारीच्या महासभेत एका विषयाच्या अनुषंगाने नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या उद्यानाच्या मुद्याला हात घालून प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले. डॉ. सलीम अली उद्यान शासनाने ताब्यात घेतले आहे, का? असा सवाल त्यांनी केला. तशा स्वरुपाचे फलक उद्यानाच्या ठिकाणी लावल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु याची कल्पना नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने सुरुवातीला दिली.
डॉ. सलीम अली उद्यानावर राज्य शासनाचा कब्जा
By admin | Updated: April 29, 2016 04:20 IST