ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १० - घुमान (पंजाब) येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे पहिल्या फेरीतच सर्वाधिक, ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. या निवडणुकीत डॉ. मोरे, ससाणे यांच्यासह डॉ. अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे असे चार उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी मोरे यांना ४९८, ससाणे यांना ४२७, कामत यांना ६५ तर नागपुरे यांना २ मतं मिळाली. यावेळच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. १०२० मतपत्रिकांपैकी १०१९ मतपत्रिका परत आल्या ज्यातील ९९२ पत्रिका वैध ठरल्या. त्यावरून पहिल्या फेरीत विजयासाठी ४९७ हा आकडा निश्चित करण्यात आला होता. मोरे यांना ४९८ मतं मिळाल्याने ते पहिल्या फेरीतच विजयी ठरले.
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोरे यांनी सर्वांचे आभार मानत आपले अध्यक्षपद दिलीप चित्रे व भा. पं. बहिरट यांना अर्पण केले.
संत नामदेव यांच्या घुमान या कर्मभूमीत ३ ते ५ एप्रिलदरम्यान साहित्य संमेलन रंगणार आहे