ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - महाराष्ट्रातल्या अनेक सेवाभावी संस्थांना उत्तर अमेरिकेतून भरघोस आर्थिक मदत मिळवून देतादेताच सर्वार्थाने त्यांचे पालकत्व स्वीकारणारे ज्येष्ठ ‘स्नेही’, महाराष्ट्र सेवा समिती या कॅनडास्थित संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅलगरी येथे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
धुळे या आपल्या जन्मगावी वडिलांच्या स्मृृतीप्रित्यर्थ का.स.वाणी स्मृती प्रतिष्ठानची स्थापना करणार्या डॉ. वाणींनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पासह अनेकानेक कामांना दहा हजार मैलांवरून ऊर्जा देण्याचे काम सातत्याने केले. 1970च्या दशकात उच्च शिक्षणासाठी महासागर ओलांडून उत्तर अमेरिकेच्या दिशेने झेपावलेल्या मराठी माणसांच्या पहिल्या पिढीने आपल्या शिरावर असलेले ‘मातृॠण’ फेडले पाहीजे, या वेडाने आयुष्यभर कार्यरत राहिलेला एक ‘ध्यासयज्ञ’ डॉ. वाणींच्या निधनाने निमाला आहे.
विमा-संख्याशास्त्र या विषयाचे संशोधक - प्राध्यापक म्हणून कॅनडाच्या विद्वत वर्तूळात सुप्रसिध्द असलेल्या डॉ. वाणी यांनी केलेल्या प्रदीर्घ सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘आॅर्डर आॅफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. धुळे आणि परिसरात अनेकानेक समाजोपयोगी कामांची उभारणी करणारे का.स.वाणी स्मृती प्रतिष्ठान, का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) या डॉ. वाणी यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर रुजवून अखंड प्रयत्नाने वाढवलेल्या संस्था.
याशिवाय डॉ. प्रकाश आमटे यांचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’, महारोगी सेवा समिती, नसीमा हुरजुक यांची कोल्हापूरातली संस्था ‘हेल्पर्स आॅफ दी हॅण्डिकॅप्ड’, नीलिमा मिश्रा या धडाडीच्या कार्यकर्तीची ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’, नाशिकच्या रजनी लिमये यांनी विशेष मुलांसाठी चालवलेली ‘प्रबोधिनी ट्रस्ट’ अशा कितीतरी संस्थांना डॉ. वाणी यांच्या प्रयत्नाने कोट्यवधी रुपयांची मदत तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा मिळाला तो सामाजिक कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ओळख’.
हेमलकसाच्या जंगलात अनेक वर्षे नि:शब्द निरलसपणे आपले काम करणारा डॉ. प्रकाश आमटे यांच्यासारखा कर्मयोगी जगाच्या नजरेस यावा म्हणून पहिली धडपड केली ती डॉ. वाणी यांनीच! डॉ. आमटे आणि नीलिमा मिश्रा यांच्यासारख्या कार्यकतर््यांच्या कामावर जागतिक मोहोर लागावी म्हणून डॉ. वाणी यांनी केलेल्या प्रयत्नांना सीमा नव्हती.
1954 साली मुंबई इलाख्यातून मॅट्रिकच्या परीक्षेत लाखभर मुलांमध्ये नवना नंबर पटकावणारा जगन्नाथ हा धुळ्याच्या केले कुटुंबातला लखलखत्या बुध्दीचा मुलगा. पुढे पुण्याला बीएस्सी करून 1967 साली हा होतकरू तरुण उच्चशिक्षणासाठी कॅनडाच्या मॅक्गील विद्यापीठात दाखल झाला.
- तिथून पुढे प्राध्यापक डॉ. जगन्नाथ वाणी यांची शैक्षणिक कारकीर्द या दत्तक-देशात मोठ्या सन्मानाने बहरली.ज्या देशाने आपल्याला जन्म दिला, शिक्षण आणि संस्कार दिले त्या मायदेशाचे ॠण आपण फेडले पाहीजे या भावनेने त्यांनी त्यांच्या समवयीनांना एकत्र केले ते 1984 साली. अमेरिका आणि कॅनडामध्ये वास्तव्याला असलेल्या मराठी माणसांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या सामाजिक कामांना हातभार लावावा या हेतूने महाराष्ट्र सेवा समितीची स्थापना हा परदेशस्थ मराठी माणसांच्या इतिहासातला एक अतीव महत्वाचा टप्पा ठरला, त्यामागे होते डॉ. वाणी यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी. केवळ इच्छुक दात्यांकडून देणग्या जमवून त्या महाराष्ट्रात पाठवणे एवढेच त्यांनी केले नाही, तर कॅनडातील सरकारी योजना आणि करसवलतीच्या मार्गांचा नेमका अभ्यास करून जमवलेल्या देणग्यांमध्ये कितीतरी पटीने भर घालणाऱ्या ‘मॅचिंग ग्रॅण्ट्स’ त्यांनी मिळवल्या आणि 1984 ते 2017 या काळात अक्षरश: अब्जावधी रुपयांचे भक्कम पाठबळ महाराष्ट्रातल्या समाजोपयोगी कामांच्या मागे उभे केले.
या संस्थांचे काम व्यापक स्तरावर पोचावे म्हणून चित्रपटासारखे लोकप्रिय माध्यम वापरण्याची कल्पनाही डॉ. वाणी यांचीच! स्किझोफ्रेनिया या विषयावरील जनजागृतीसाठी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या साथीने त्यांनी निर्मिलेल्या ‘देवराई’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेतली. डॉ. प्रकाश आमटे, नीलिमा मिश्रा, नसीमा हुरजूक आदिंच्या कामाचा प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्र सेवा समितीने निर्मिलेले लघुपटही उत्कृष्ट निर्मितीमूल्यांंमुळे चांगलेच गाजले.
डॉ. वाणींचा रहिवास होता कॅनडामध्ये! पण दहा हजार मैलांवरून त्यांचे लक्ष सदैव असे ते महाराष्ट्राच्या त्यांच्या मातृभूमीकडे!-अर्थात त्यांचे व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन जिथे रुजले, त्या उत्तर अमेरिकेलाही त्यांनी भरभरून दिले. भारतीय संगीत आणि नृत्याच्या प्रसारार्थ त्यांनी स्थापन केलेली ‘रागमाला सोसायटी’ असो, की तुलनेने विरळ मराठी वस्ती असलेल्या कॅलगरी भागात मराठी भाषकांना एकत्र आणणारी ‘ कॅलगरी मराठी असोसिएशन’, उत्तर अमेरिकेतल्या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी असत. 2001 साली कॅलगरी या सुंदर गावात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे आयोजनही त्यांनी एकट्याच्या बळावर यशस्वीपणे तडीला नेले होते.
एवढेच नव्हे, तर उत्तर अमेरिकेतल्या या सर्वात भव्य मराठी आयोजनांमध्ये लेखक-विचारवंतांनाच अध्यक्ष म्हणून बोलावण्याची परंपरा डॉ. वाणी यांनी मोडली, आणि डॉ. अभय बंग यांना आमंत्रित केले. त्यानंतरच्या मराठी अधिवेशनांमध्ये महाराष्ट्रातल्या सामाजिक कामांना मानाचे पान मिळत गेले, त्यामागे डॉ. वाणी यांचा कृतीशील आग्रहच होता.
डॉ. वाणी यांच्या पत्नी कमलिनी या प्रदीर्घकाळ स्किझोफ्रेनिया या मानसिक व्याधीने ग्रस्त होत्या. वैयक्तिक आयुष्यातल्या या संकटाचे मळभ तर सोडाच, पण त्या संकटाचे संधीत रुपांतर करण्याची हिंमत डॉ. वाणी यांनी दाखवली. जे आपल्या वाट्याला आले, ते अन्य ज्या ज्या कुटुंबांना सोसावे लागेल त्यांचा आधार होण्याच्या भावनेने डॉ. वाणी यांनी सुरू केलेल्या ‘सा’ या संस्थेच्या कामाची व्याप्ती आता कितीतरी वाढली असून पुण्यातले ‘सा’ चे आधारगृह हा स्क्रिझोफ्रेनियाग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी आधाराचा ओलावा ठरला आहे.
पत्नीवियोगानंतर वाट्याला आलेल्या कर्करोगाचा सामना मोठ्या धैर्याने करताकरता शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहण्याचा हट्ट पूर्णत्वाला नेणारे डॉ. वाणी रुग्णालयात असतानाही हातातले ‘प्रोजेक्टस’ संपवण्यात मग्न होते. त्यांच्यापासून जगाचा आणि मुख्य म्हणजे त्यांना प्राणाहून प्रिय असणाऱ्या कामाचा ‘बंध’ तुटला, तो अखेरच्या काही दिवसांपुरताच!डॉ. वाणी यांच्यामागे त्यांचा कॅनडास्थित मुलगा श्रीराम, सून प्रतिमा, नातवंडे, दोन मुली, धुळे शहर व परिसरात असलेले त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे बोट धरून चाललेली-वाढलेलीे अनेकानेक सामाजिक कामे-कार्यकतर््यांचे मोहोळ आहे.