पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य संंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही नियामक मंडळाकडूनच केली जाईल, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या घटनेत स्पष्टपणे नमूद आहे. असे असतानाही नियामक मंडळाच्या एकाही सदस्याला विश्वासात न घेता परिषदेच्या कार्यकारी समितीने परस्पर संंमेलनाध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केली. त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.डॉ. पटेल यांना विरोध नाही; परंतु नियामक मंडळाचा निर्णय झालेला नसताना पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे हे परिषदेच्या घटनेविरुध्द असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. येत्या १५ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.नाट्य परिषदेकडे अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल व मोहन जोशी यांच्या नावांचा प्रस्ताव आला. त्यावर कार्यकारी समितीने चर्चा करून पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे व १५ डिसेंबर रोजी होणाºया नियामक मंडळाच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व प्रवक्ते मंगेश कदम यांनी बुधवारी सांगितले. राज्यातील राष्ट्रपती राजवटीमुळे संमेलन केव्हा, कुठे आणि कसे होणार हे अनिश्चित असताना अध्यक्षपदी कोण असेल हे सांगण्याची घाई परिषदेने दाखवली आहे.कार्यकारी समितीच्या निर्णयाला नियामक मंडळाची मंजुरी घ्यावी लागते. १५ डिसेंबरच्या नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन एका नावावर शिक्कामोर्तब झाले असते मग एवढी घाई का करण्यात आली?, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. जब्बार पटेल यांची निवड घटनाविरोधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:36 IST