ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीला आता रंग चढला असून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नारायण राणेंवर बोचरी टीका केली. एका झाडावरुन दुस-या झाडावर उड्या हे माकडाचं काम आहे. त्यामुळे पक्ष बदलणा-या माकडांना मतं देऊ नका असे सांगत असदुद्दीन ओवेसींनी नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली.
शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने नारायण राणे यांना मैदानात उतरवले आहे. मातोश्रीच्या बालेकिल्ल्यात होणा-या या निवडणुकीला आता रंग चढत असून एमआयएमनेही उमेदवार उभा केल्याने शिवसेना व काँग्रेससमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात प्रचार सभा घेतली. या प्रचारसभेत ओवेसी यांनी नारायण राणे व अभिनेता सलमान खानवर बोच-या शब्दात टीका केली.
नारायण राणेंवर टीका करताना ओवेसींनी थेट माकडाचे उदाहरण दिले आहे. त्यामुळे ओवेसींच्या या टीकेवर राणे कसा प्रहार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिनेता सलमान खानवर टीका करताना ओवेसींनी सलमानचे थेट नाव न घेता त्याचा बेवडा म्हणून उल्लेख केला. भाजपा सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदीऐवजी दारुबंदी आणली असती तर निष्पाप लोकांचा जीव वाचला असता असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.