ठाणे : अवघ्या दोन अडीच महिन्यांसाठी ठाणेकरांवर पोटनिवडणुका लादू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. निवडून येणाऱ्या नगरसेवकांसाठी तो औटघटकेचा काळ असून द्वीसदस्यीय पद्धतीमुळे त्याच प्रभागातील अन्य नगरसेवकांकडून संबंधित प्रभागातील कामेही सुरळीतपणे सुरु असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ठाणे न्यायालयाने एका खून प्रकरणात प्रभाग क्र मांक ५३ (अ) चे शिवसेना नगरसेवक राजेश गवारी यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांचे पद मार्चमध्ये रिक्त झाले आहे. तसेच प्रभाग क्र मांक ३२ (अ) चे नगरसेवक, कॉंग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांनी १३एप्रिल रोजी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. २० एप्रिल रोजी निवडणूक आयुक्तांकडे राजीनाम्याची प्रत दिली आहे. पालिका सदस्यास कोणत्याही वेळी आयुक्तास लेखी नोटीस देऊन पदाचा राजीनामा देता येतो. याअनुषंगाने घाडीगावकर यांचे पद १३ एप्रिल रोजी रिक्त झाले. तरीही तेथील सर्व कामे सुरळीतपणे सुरू आहेत. असे असताना पोटनिवडणुका लावून पैशांची नासाडी होऊ नये, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे.
तीन महिन्यांसाठी पोटनिवडणुका नको
By admin | Updated: July 20, 2016 04:21 IST