ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० - शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करून, स्वाभिमान गहाण ठेऊन जर सत्ता मिळत असेल तर अशी सत्ता नकोच असा पवित्रा शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वात जास्त जागा मिळवत सत्तास्थापनेसाठी दावा केला, मात्र शिवसेनेला त्यात कोठेही स्थान मिळालेले दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच माफी मागितल्यावरच शिवसेनेशी युती होईल असा पवित्रा भाजपा नेत्यांनी घेतल्याचे वृत्त फिरत आहे. त्या पार्श्वभूमीवरच शिवसेना आमदार जाधव यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
महाराष्ट्रापासून मुंबई व विदर्भ वेगळा करण्याचा भाजपाने घाट घातला असल्याची टीका त्यांनी केली. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत मराठी माणसाकडे नजर वाकडीकरून पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. मात्र आता सर्वजण मराठी माणसाला घाटी म्हणून चिडवतात. भाजपा मराठी माणासाला अपमानास्पद वागणूक देत असून भाजपा त्यांची अस्मिता चिरडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्यामुळे आपली अस्मिता, तत्व सोडून भाजपाला साथ देण्याची गरज नाही असे आपले वैयक्तिक मत असल्याचे जाधव यांनी सांगितले.