व्ही. के. सिंह : भाजप पदाधिकाऱ्यांना सल्लानागपूर : आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यशाचे मंत्र सांगण्यासाठी आलेले केंद्रीय विदेश राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व्ही.के. सिंह यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीऐवजी सरकारच्या विदेश धोरणांपासून तर अमरनाथ यात्रेकरूंवर होत असलेल्या हल्ल्यापर्यंत प्रश्न विचारून त्यावरील त्यांची मते जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यावर जाऊ नका तर विधानसभेसाठी ते चारपट अधिक तयार करा, असा सल्लाही त्यांनी दिला.विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमधील सर्व विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांनी भेटी देऊन निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घ्यावा, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय विदेश राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी मध्य नागपूर मंडळातर्फे गणेशपेठस्थित कार्यालयात मध्यच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला सिंह यांनी निवडणुकीच्या काळात काय करायचे आणि काय करू नये, याबाबतच्या टीप्स दिल्या. निवडणुकीत बुथ कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवा, मतदार यादीतील चुका दुरुस्त करा, लोकांशी संपर्क वाढवा. लोकसभेतील मताधिक्यावर जाऊ नका, विधानसभेसाठी चारपट अधिक तयारी करा, तरच लोकसभेतील यश टिकून राहील, असा सल्ला सिंह यांनी यावेळी दिला. त्यानंतर त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या माध्यमातून निवडणूक तयारीबाबत स्थिती जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. पण उपस्थित पदाधिकाऱ्यांमधील ‘पत्रकार’ जागा झाला आणि त्यांनी निवडणूक तयारी विषयक प्रश्न सोडून देशपातळीवरील प्रश्नांकडेच मोर्चा वळविला. सेना आणि राजकारण यातील फरक काय?, देशाचे विदेश धोरण कसे असावे? केंद्रात ‘आपले’च सरकार असताना अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ले का? पाकपुढे मैत्रीचा हात पुढे करूनही सीमेवर हल्ले का? आणि संरक्षण दलाप्रमाणे सीमा सुरक्षा दलातील जवानांना सेवानिवृत्तीचे लाभ का नाही? असे एक नव्हे अनेक प्रश्न सिंह यांना विचारण्यात आले. एकाही पदाधिकाऱ्याने निवडणुकीच्या तयारीसंदर्भात प्रश्न केला नाही. पक्षाचा केंद्रीय मंत्री याऐवजी एक सेवानिवृत्त लष्करप्रमुख म्हणून सिंह यांची मते जाणून घेण्यात उपस्थितांना अधिक रुची होती. सिंह यांनीही या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना सेवानिवृत्त लष्करप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय मंत्री यातील सीमारेषेचे भान बाळगले.लष्करप्रमुख आणि एक राजकारणी यातील फरक सांगताना सिंह म्हणाले की, एक लष्करप्रमुख हा समाजाकडून शिकत असतो, तर एक राजकारणी समाजाला काही तरी देत असतो. सीमेवर हल्ले हा विषय संरक्षण खात्याचा असल्याने त्यांनी बोलणे टाळले. पण सेनेला त्यांचे काम करू दिले तर देशाच्या सीमेला कुठलाही धोका राहणार नाही, याकडेसुद्धा त्यांनी लक्ष वेधले. वैदिक-हाफिज भेटीचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेल्या विदेश धोरणाच्या प्रश्नावर त्यांनी ‘ एका पत्रकाराच्या भेटीने देशाचे विदेश धोरण ठरत नाही’, असे उत्तर दिले. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा गृहखात्याचा विषय आहे आणि सरकार कारवाई करण्यास सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला पक्षाचे शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे,आमदार विकास कुंभारे, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, श्रीकांत देशपांडे, प्रमोद पेंडके आणि मध्य मंडळाचे अध्यक्ष गुड्डू त्रिवेदी, महापालिकेतील सत्तापक्ष नेते प्रवीण दटके उपस्थित होते.(प्रतिनिधी)मध्य नागपूरच का? नागपूर शहरात विधानसभेचे सहा मतदारसंघ असताना, केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी शनिवारी मध्य नागपूरचीच निवड का केली, असा प्रश्न कार्यकर्त्यांचा होता. त्याला दुपारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित मध्य नागपुरातील बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात आमदार कृष्णा खोपडे यांनी वाट मोकळी करून दिली. याला उत्तर देताना सिंह म्हणाले की, देशाचे मध्यस्थान नागपूर असून, नागपूरच्या मध्यभागी मध्य नागपूर मतदारसंघ आहे. त्यामुळे मध्यची निवड केली. विधानसभेची तयारी करताना बुथ प्रमुखाला केंद्रस्थानी ठेवून नियोजन करा. या मतदारसंघातून भाजप विजयी झाल्यावर आपण पुन्हा येऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाला मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उपमहापौर जैतुन्नबी अन्सारी, गिरीश व्यास, माजी आमदार अशोक मानकर उपस्थित होते.महागाईचे भूतमहागाईच्या मुद्यावर लोकसभा निवडणुका जिंकल्यावर ती कमी करण्यात सरकारला यश न आल्याने त्याचे भूत सध्या सरकारच्या मानगुटीवर बसल्याचे दिसून येत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जाऊ नका, देशात सत्ता आल्यावरही महागाई कमी झाली नसल्याने लोक जाब विचारतात. त्यांचे समाधान होईल असे उत्तर द्या, महागाई वाढण्यासाठी कोणती कारणे आहेत, हे त्यांना समजावून सांगा, विशेषत: महिला पदाधिकाऱ्यांनी याबाबत अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा सल्ला व्ही.के. सिंह यांनी कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत बुथ कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवा, मतदार यादीतील चुका दुरुस्त करा, लोकांशी संपर्क वाढवा. लोकसभेतील मताधिक्यावर जाऊ नका, विधानसभेसाठी चारपट अधिक तयारी करा, तरच लोकसभेतील यश टिकून राहील, असा सल्ला सिंह यांनी यावेळी दिला.
लोकसभेतील मताधिक्यावर विसंबू नका
By admin | Updated: July 27, 2014 01:26 IST