मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया १०० टक्के आॅनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. मात्र प्रवेश अर्ज चुकीचे भरलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज बाद झाल्यानंतर मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आॅफलाइन प्रवेशासाठी गर्दी केली जात आहे. ‘काहीही करा, मात्र प्रवेश द्या’, अशा गाऱ्हाण्यांमुळे उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वर्ग मात्र पुरता हैराण झाला आहे.या वर्षी न्यायालयाच्या आदेशामुळे एकही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने करणार नाही, अशी भूमिका शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे. मात्र चुकीचा अर्ज भरल्याने दोन्ही गुणवत्ता यादीत नाव न आलेले विद्यार्थी थेट उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेत आहेत. याशिवाय पहिल्या यादीत नाव आल्यानंतरही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थीही प्रवेशासाठी कार्यालयात येत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.मुळात अपूर्ण प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चौथ्या गुणवत्ता यादीच्या रूपात किंवा समुपदेशन फेरीच्या रूपात १५ जुलैनंतर मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ५० हजारहून अधिक जागाही उपलब्ध आहेत. मात्र पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून पालक विद्यार्थ्यांसोबत उपसंचालक कार्यालयात गर्दी करीत आहेत. त्यात अधिक संख्या ही पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयांत प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांची आहे. कारण हे विद्यार्थी गुणवत्ता असतानाही प्रवेश प्रक्रियेबाहेर पडलेले आहेत. त्यामुळे अपूर्ण अर्ज भरलेल्या आणि गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी १५ जुलैपर्यंत कार्यालयात येऊ नये, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)यांमधील बहुतांश विद्यार्थी उपसंचालक कार्यालयात येत आहेत...- ८२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज अपूर्ण भरला.- २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज पूर्ण भरला, मात्र तो कन्फर्म करून अप्रूव्ह केला नाही.- ३ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला, मात्र तो कन्फर्म केल्यानंतर अप्रूव्ह केला नाही.- १ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून कन्फर्म करून अप्रूव्ह केला, मात्र पसंतीक्रम अर्ज अपूर्ण भरला.- १ हजार १२७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरला, मात्र तो कन्फर्म करून अप्रूव्ह केला नाही.म्हणून आॅफलाइन प्रवेशाचा गोंधळकल्याणच्या एका विद्यार्थिनीला 98%गुण मिळाले होते. मात्र प्रवेश अर्ज चुकीचा भरल्याने ती आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडली होती. एका गुणवंत विद्यार्थिनीचे नुकसान होऊ नये, म्हणून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण उपसंचालकांना संबंधित विद्यार्थिनीला प्रवेश मिळवून देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणानंतर प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले बहुतेक विद्यार्थी प्रवेशाची अपेक्षा घेऊन कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले.
‘काहीही करा पण आम्हाला प्रवेश द्या’
By admin | Updated: July 9, 2016 02:22 IST