सुरेश लोखंडे, ठाणेराज्यात सुमारे २१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. त्यातील बहुतेक बँकांची मुदत संपलेली असतानाही त्यांच्या निवडणुका लांबलेल्या आहेत. यापैकी सुमारे १३ बँकांच्या निवडणुका नोव्हेंबर अखेर घेण्यासाठी राज्य सहकार विभागाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. सहकार आयुक्तालयाकडून पुणे येथे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये लांबलेल्या बँकांच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित झाला असता सुमारे १३ बँकांची निवडणूक नोव्हेंबर अखेर घेण्यास हिरवा कंदील दिल्याचे सांगण्यात आले़ तर उर्वरित आठ बँकांच्या निवडणुका डिसेंबर अखेर घेतल्या जाणार आहे. यामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्याचे नियोजन सहकार आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका या आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रात घेतल्या जात असत. पण ९७ व्या घटना दुरूस्तीनुसार स्वतंत्र प्राधिकरणाअभावी सहकारी बँकांच्या निवडणुका लांबल्या होत्या. याशिवाय २०१३ पासून सुधारीत सहकार कायदा देखील लागू झाला आणि स्वतंत्र प्राधिकरणाची देखील स्थापना झाली आहे. याशिवाय एका जनहित याचिकेसनुसार बँकांच्या निवडणुका डिसेंबर २०१४ पूर्वी घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.पण लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभाच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. यानंतर नवनियुक्त सहकार प्राधिकरणाव्दारे राज्यातील २१ बँकांच्या निवडणुका हाती घेण्याचे नियोजन सहकार खात्याने केले आहे. यामध्ये प्रथमत: मार्च २०१३ मध्ये मुदत संपलेल्या सुमारे १३ बँकांची निवडणूक नोव्हेंबर अखेर घेतली जाणार असून उर्वरित ८ बँकांची निवडणूक डिसेंबरपूर्वी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा बँकांच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर
By admin | Updated: September 29, 2014 07:33 IST