पुणे : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाहनचोरी आणि मोबाईलचोरी करणाऱ्या सहा जणांना अटक करून २५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून १२ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, ही कारवाई युनिट तीन आणि संघटित गुन्हेगारीविरोधी पथक (उत्तर विभाग) यांनी संयुक्तपणे केल्याची माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. सौरभ विलास शिंदे (वय १९, रा. मु. पो. फुलगाव, ता. हवेली), पंकज काळुराम शिंदे (वय २२), रवी रमेश पाटील (वय २०), वनेश सुभाष (वय २०, रा. पेरणे फाटा, वाघोली), राजेंद्र प्रभू बिडगर (वय ३४, रा. मु. पो. सितपूर, ता. कर्जत) आणि किरण चंद्रकांत काटे (वय १९, रा. बिबवेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वाहनचोरीतील रोहिदास उर्फ रोहित शिवाजी सूर्यवंशी (रा. केसनंद, वाघोली) हा पसार झाला आहे. आरोपींनी शहरातील काही मॉल्स, तसेच रुग्णालयांच्या पार्किंगमधील वाहने चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांच्या पथकाने येरवड्यातील सादलबाबा चौकामध्ये सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. तर, वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने आरोपी राजेंद्र बिडगरला अटक केली. त्याच्याकडून ९० हजार रुपए किमतीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण काटे याला बिबवेवाडीमध्ये पकडून त्याच्याकडून चोरीचे ११ मोबाईल जप्त करण्यात आल्याचे उपायुक्त साकोरे यांनी सांगितले. या तीनही कारवाया अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. >एका महाविद्यालयामध्ये रवी पदवीचे शिक्षण घेत आहे. तर सौभर याला घरामधून हाकलण्यात आलेले आहे. सर्व आरोपी रवीच्याच खोलीवर रहात होते. यासर्वांनी चोरलेली वाहने बीदर, भालकी आणि उस्मानाबाद परिसरात विकली आहेत. पैशांची हौस भागवण्यासाथी त्यांनी अगदी २ ते ३ हजार रुपयांत ही वाहने विकल्याचे समोर आले आहे. वाहनचोरीसाठी ते ‘मास्टरकी’ चा वापर करीत होते.
गुन्हे शाखेकडून २५ गुन्ह्यांची उकल
By admin | Updated: May 17, 2016 01:06 IST