ठाणे : काही महिन्यांवर आता ठाणे महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. परंतु, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सुटल्या का, याचा मागोवा घेऊन नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचा ऊहापोह लोकमतच्या माध्यमातून ‘लोकमत आपल्या दारी’, या उपक्रमांंतर्गत केला जाणार आहे. त्यानुसार, येत्या ५ आॅगस्ट रोजी प्रभाग क्र. ६ मध्ये या उपक्रमांंतर्गत प्रभागातील नागरिकांना आपल्या समस्या नगरसेवकांसमोर मांडता येणार असून त्या समस्यांचे निराकरण नगरसेवक कशा पद्धतीने करणार, याचेही उत्तर मिळणार आहे.५ आॅगस्टला सकाळी ११ वाजता ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडिअममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक संजय आणि उषा भोईर हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जोडीला ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर हेसुद्धा उपस्थित राहणार असून सहायक आयुक्त मारुती गायकवाड उपस्थित राहणार आहेत. पूर्वी आगरी आणि कोळी लोकांचा प्रभाग म्हणूनही या प्रभागाची ओळख होती. अनेक समस्या या प्रभागात आहेत. त्या नगरसेवकाने सोडवल्या अथवा नाहीत किंवा त्या आता कोणत्या स्वरूपात आहेत, याचा ऊहापोह या कार्यक्रमातून घेतला जाईल.
ढोकाळीत शुक्रवारी चर्चा
By admin | Updated: August 1, 2016 03:28 IST