मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील गहू आणि तांदळाचा अवैध साठा केल्याप्रकरणी शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या मुंबई पथकाने आठवडाभरात तीन वेगवेगळ््या ठिकाणी छापे टाकले. त्यात सुमारे ५ लाख रुपयांचा हजारो किलो माल जप्त करण्यात आला आहे.नागरी पुरवठा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ आणि ११ सप्टेंबर रोजी ठाण्यातील तीन वेगवेगळ््या ठिकाणी भरारी पथकाने ही कारवाई केली. त्यात ठाण्यातील वागळे इस्टेटमधील किसननगर क्रमांक तीन येथील बिंदू सदन इमारतीमधील गाळ््यासह किसननगर क्र. २ मधील अधिकृत शिधावाटप दुकान क्र. ३६-फ-६६ आणि जय जवान को-आॅप. सोसायटी या संस्थेच्या शिधावाटप दुकान क्र. ३६-फ-८२ या दुकानांचा समावेश आहे.बिंदू सदन इमारतीमधील गाळ््यावर केलेल्या कारवाईत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ३ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा १४५ क्विंटल गव्हाचा अवैध साठा आढळून आला. याप्रकरणी उमेश श्याम वर्मा व गाळामालक जयप्रकाश भोलाप्रसाद जयस्वाल या दोघांविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक ३६-फ-६६ या दुकानावर केलेल्या कारवाईत योजनेतील २ हजार ५४० किलो तांदूळ आणि ३ हजार ६९५ किलो गव्हाचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९९ हजार ५७५ रुपये इतकी आहे. याप्रकरणी दुकान चालविणाऱ्या मे. जयभवानी संस्थेचे सचिव दीपक गोसर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत अपहार
By admin | Updated: September 14, 2015 02:45 IST