नागपूर : राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित शुक्रवारी सकाळी नागपुरात आले. अधिकाऱ्यांशी संक्षिप्त चर्चा करीत ते गडचिरोली दौऱ्यावर रवाना झाले. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते तेथील स्थिती जाणून घेणार आहेत.पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिसऱ्याच दिवशी थेट नक्षलवाद्यांच्या गुहेत दौऱ्यावर जाणारे दीक्षित पहिलेच पोलीस महासंचालक ठरले आहेत. गुरुवारी रात्री ते मुंबईहून नागपूरकरिता निघाले. शुक्रवारी सकाळी दुरंतो एक्स्प्रेसने रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर तेथून ते पोलीस जिमखान्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले ‘स्कॉटिंग आणि सिक्युरिटी गार्ड’ परत पाठविले. येथे निवडक अधिकारी आणि मोजक्या मान्यवरांशी थोडक्यात चर्चा केल्यानंतर ते सरळ गडचिरोलीला निघाले. दीक्षित शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस गडचिरोलीत थांबणार असून, येथील अधिकाऱ्यांकडून ते गडचिरोलीतील नक्षलवाद, पोलीस अन् सध्याच्या स्थितीची माहिती घेतील. त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीन बिहारी आहेत.
पोलीस महासंचालक गडचिरोली दौऱ्यावर
By admin | Updated: October 3, 2015 03:45 IST