मुंबई : बुधवारी सेवानिवृत्त होत असलेले संजीव दयाल यांच्या जागी भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या नियुक्त्यांना मंजुरी दिली. महामंडळ सुरक्षा विभागाचे प्रमुख विजय कांबळे हे एसीबीचे प्रमुख असतील. पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरुप पटनायक सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सतीश माथूर यांची नियुक्ती झाली आहे. विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर यांना बढती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी) -----------------कांबळे यांच्याकडे मोठी जबाबदारी सध्या एसीबीअंतर्गत सिंचन घोटाळा, सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यामुळे दीक्षित यांच्यानंतर ही प्रकरणे हाताळण्याची मोठी जबाबदारी विजय कांबळे यांच्याकडे आलेली आहे. ------------------भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळप्रवीण दीक्षित हे १९७७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षांत भ्रष्ट व लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम उघडली. लाचखोरांना पकडण्यासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांमुळे भ्रष्टाचारी पोलिसांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. दीक्षित पुढच्या वर्षी ३१ जुलैला सेवानिवृत्त होतील. त्यांना महासंचालकपदाचा १० महिन्यांचा कालावधी मिळेल. कुलाब्यातील पोलीस मुख्यालयात दुपारी दयाल यांच्या निरोपाचा व दीक्षित यांच्या स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. -----------------1977 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले दयाल ३१ जुलै २०१२ पासून पोलीस महासंचालक होते. राज्य पोलीस दलाच्या इतिहासात त्यांच्या इतका ३८ महिन्यांचा दीर्घ कालावधी यापूर्वी केवळ के. सी. मेढेकर यांनाच मिळाला.
दीक्षित राज्याचे पोलीस महासंचालक
By admin | Updated: September 30, 2015 02:54 IST