मुंबई : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी जस्टीस फॉर रोहित वेमुला संघटनेमार्फत धारावीत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चावर कामराज स्कूलजवळ हल्ला झाला. कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना झालेल्या हल्ल्यात चार तरुणी जबर जखमी झाल्या आहेत. हल्लेखोरांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आंदोलकांनी धारावी पोलीस ठाण्याला घेराव घातला.जस्टीस फॉर रोहित वेमुला संघटनेमार्फत धारावीत रविवारी सायंकाळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. ९0 फुटी रस्त्यावरील कामराज हायस्कूलजवळ मोर्चा येताच येथे १० ते १५ जणांनी या मोर्चावर हल्ला चढवला. बांबू आणि काठ्यांनी केलेल्या मारहाणीत चार तरुणी जखमी झाल्या. हल्लेखोरांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याने सुमारे पाचशेच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला. धारावीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असून, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप जस्टीस फॉर रोहित वेमुला संघटनेने केला आहे.
रोहित वेमुला समर्थकांवर धारावीत हल्ला
By admin | Updated: January 25, 2016 03:07 IST