Devendra Fadnavis on Sharad Pawar: "मला असं वाटतं की शरद पवारांचा जो काही लेख आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. मला दुःख आहे की शरद पवारांनी अशा प्रकारचा लेख लिहिला", असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या विधानावर रोखठोक भूमिका मांडली. शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध राहिलेला नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, 'शरद पवारांचा वारकरी विचारांशी संबंध नाही'
"खरं असं आहे की शरद पवारांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असले तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही. कारण ज्या प्रकारची चळवळ या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभी केली किंवा त्यांच्या अनुयायांनी उभी केली, ती चळवळ एकप्रकारे निधर्मी अशा प्रकारची चळवळ होती. त्यांनी स्वतःही अनेकवेळा कबूल केलं आहे की, ते निधर्मी आहेत. धर्म मानत नाहीत किंवा कुठल्याही ठिकाणी, त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे", असे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
"मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी. किंबहुना मध्यंतरीच्या काळात हा प्रयत्न झाला की, वारकरी संप्रदायामध्ये काही लोक चिडून वारकरी विचार आहे त्याच्या बिलकूल विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा लोकांना वारकरी संप्रदायाने बाहेर काढलं", अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
'शरद पवारांचा लेख चुकीचा, त्याचं मला दुःख वाटतंय'
फडणवीस पुढे म्हणाले की, "आपण एक लक्षात घ्या ही जी हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे, किमान ८००-९०० वर्षांचा इतिहास आपण बघितला, तर वारकरी विचार हा श्रद्धेचा विचार आहे. वारकरी विचार हा बंधुतेचा विचार आहे. आणि वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेत प्रत्येक जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या मनातील चित्ताची शुद्धता झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारा, पर्यावरणाशी साधर्म्य साधणारा अशा प्रकारचा विचार आहे. मला असं वाटतं की शरद पवारांचा जो काही लेख आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. मला दुःख आहे की शरद पवारांनी अशा प्रकारचा लेख लिहिला."
"प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळी मते येत असतात. शेवटी साहित्य संमेलनाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून, देशाचे माजी कृषिमंत्री म्हणून किंवा एकूणच राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान आहे म्हणूनच त्यांचा लेख घेतला. त्यात काय लिहावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तो लिहिला", असे मत फडणवीस यांनी मांडले.
"त्या लोकांची यादी मी त्यांना पाठवून देईन"
"त्यांना यादी हवी असेल, तर वारकरी विचारांच्या विरोधात जाऊन जे लोक वारकरी संप्रदायामध्ये विचार मांडण्याचा प्रयत्न करताहेत, अशा लोकांची यादी मी त्यांना पाठवून देईन. ज्या लोकांनी वारकरी संप्रदायाने झिडकारले, त्या लोकांचा संबंध आम्हाला अर्बन नक्षल चळवळीशी देखील आम्हाला पाहायला मिळाला", असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानावर दिले.
शरद पवारांचे विधान काय?
"वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल, अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारणतः चाळीस लोक असे आहेत की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन आणि प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे", असे शरद पवार म्हणाले होते.
Web Summary : Fadnavis strongly criticized Sharad Pawar's views on the Warkari sect, stating Pawar's article was wrong and that he lacks understanding of the sect's values. He offered to provide a list of those opposing Warkari thought.
Web Summary : फडणवीस ने शरद पवार के वारकरी संप्रदाय पर विचारों की कड़ी आलोचना की, कहा कि पवार का लेख गलत था और उन्हें संप्रदाय के मूल्यों की समझ नहीं है। उन्होंने वारकरी विचारधारा का विरोध करने वालों की सूची देने की पेशकश की।