Devendra Fadnavis Sharad Pawar, Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप भारतीय हिदूंना ठार केले. एकूण सात ते आठ दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी चार दहशतवाद्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. यापैकी दोन दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारून तेथील हिंदूंना जाणीवपूर्वक ठार केले, असे हल्ल्यातून बचावलेल्या काही महिलांनी सांगितले. या साऱ्या घटनेनंतर घडलेल्या प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी एक विधान केले. त्या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले....
"इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथे जी लोकं होती, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे", असे विधान शरद पवार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रत्युत्तर
शरद पवारांच्या या विधानावर फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी सावध प्रत्युत्तर दिले. "शरद पवार काय म्हणाले हे मी ऐकलं नाही. पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वत: त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मला माहिती आहे. शरद पवारांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं," असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
"भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी जे लोक महाराष्ट्रात आहेत, त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. दिलेल्या वेळेत या सगळ्यांनी देश सोडून जायला हवे यादृष्टीने मॉनिटरींग केले जाईल. यात कुणी दिरंगाई केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. व्हिसा रद्द झालेला पाकिस्तानी नागरिक या महाराष्ट्रात राहणार नाहीत याची आम्ही योग्य काळजी घेऊ," असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.