प्रलंबित प्रश्न सोडविणार : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : नागपूरसारख्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट यासारख्या संस्था येत आहे. मिहान प्रकल्पानेही आता वेग धरला असून नागपूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून विकासाला गती देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मौजा वाठोडा शेषनगर येथे नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर गृहबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, नासुप्रचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, मनपा आयुक्त श्याम वर्धने, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, नागपूरकरांचे स्वप्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. विकासाच्या दृष्टीने गतिशील आणि पारदर्शी निर्णय सरकारने घेतले आहे. आता उद्योग येणे शक्य होणार आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आल्यामुळे उद्योग विस्ताराचे परवाने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. नासुप्रने पहिल्या टप्प्यात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी १० हजार घरे बांधावीत. मागासवर्गीयांसह पोलीस व सफाई कामगारांच्या घरांसाठी सुद्धा वाढीव चटईक्षेत्र देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लकडगंज येथील जागेवर पोलीस वसााहत निर्माण करता येईल. चांगली कामे व्हावीत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधारणा करण्यात येत आहे. चार्टर्ड आर्किटेक्टला प्लॅन मंजूर करण्याचे अधिकार देण्यात येईल. मात्र हे अधिकार देतांना चुकीचे काम केल्यास सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूदसुद्धा करण्यात येईल. शहरातील अनधिकृत लेआऊटमधील लोकांची घरे नियमित झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येईल. झोपडपट्टीवासीयांना पट्टेवाटपाची योजना तयार केली असून झोपडपट्टीतील व्यक्तींना सुद्धा मालकी हक्काचे पट्टे देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहराच्या आजूबाजूला जवळपास चार हजार कोटीचे रस्ते मंजूर केले आहे. नऊ हजार कोटीतून मेट्रो रेल्वे येत आहे. अडीच हजार कोटी रुपयातून एम्स हॉस्पिटल उभारले जाणार आहे, असे अनेक निर्णय केंद्र सरकारने नागपूरसाठी घेतले आहे. ले-आऊट नियमित करून नियोजनबद्ध पद्धतीने शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण आग्रही असून गरिबांसाठी स्वस्तात घरे बांधली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार कृष्णा खोपडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नासुप्रचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. संचालन व आभार रेणुका देशपांडे यांनी मानले. (प्रतिनिधी)८५ कोटीचा प्रकल्प, उभारणार ४४८ घरे नागपूर सुधार प्रन्यासच्या या जागेवर शहरातील अल्प उत्पन्न गटाकरिता १६८ घरे व मध्यम उत्पन्न गटाकरिता २८० घरे अशी एकूण ४४८ घरे बांधण्यात येणार आहे. यावर ८५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सर्व सोयींनी परिपूर्ण राहणार असून एक लहान क्लब हाऊस, लॅण्ड स्केपिंग, लहान मुलांची खेळणी, पथदिवे आणि पदपथ आदींची सोय करण्यात येणार आहे. प्रकल्पामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी स्वच्छ करून पुन्हा वापरण्याचे तंत्रज्ञान या प्रकल्पात वापरण्यात येणार आहे. तसेच सोलर वॉटरच्या माध्यमातून गरम पाण्याची सोय करण्यात येणार आहे. अग्नी प्रतिबंधक योजनेची व्यवस्था सुद्धा यामध्ये करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ३० महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न नासुप्रचा राहणार आहे.
उपराजधानीला विकासाचे बुस्ट
By admin | Updated: December 26, 2014 00:56 IST