नितीन गडकरी यांची ग्वाही : उपराजधानीत एम्स, मेट्रो, उड्डाण पूल उभारणारनागपूर : जागतिक दर्जाच्या दिशेने नागपूर शहराची वाटचाल सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भाला एम्स, अत्याधुनिक रेल्वेगाड्या, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, उड्डाण पूल, तलावांच्या सौंदर्यीकरणासह शहर विकासाच्या विविध योजनांसाठी १२ ते १३ हजार कोटींचा निधी उपलब्ध होईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली. केंद्र शासनाने अवघ्या ४५ दिवसात शहरातील विविध विकास प्रकल्पांना चालना देणारे निर्णय घेतल्यानिमित्ताने शहरातील नागरिकांनी गडकरी यांचे आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर जल्लोषात स्वागत केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर हे देशाचे हृदयस्थान आहे. या शहराचा औद्योगिक विकास व्हावा, विदर्भातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, या दृष्टीने भविष्यात विविध प्रकल्प उभारण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली.एम्समुळे नागपूरसह विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. किडनी, हृदयासह गंभीर आजारावरील गुतागुंतीच्या शस्त्रक्रि यांसाठी रुग्णांना मुंबई, दिल्लीला जावे लागणार नाही. नागपूर शहरासाठी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आलेल्या बहुसंख्य मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. अमृतसरला जाण्यासाठी रेल्वे देण्यात आली आहे. अनेक गाड्यांशी शहर जोडण्यात आले आहे. ज्या मागण्यांना मंजुरी मिळाली नाही. त्याही भविष्यात पूर्ण होतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात छेडले असता मोठ्या नेत्यांवर आरोप होतच असतात, असे गडकरी म्हणाले.मोदी यांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीसंदर्भात विचारणा करता गडकरी यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले.तलाव सौंदर्यीकरणासाठी ५० कोटीशहरातील गांधीसागर, फुटाळा, सोनेगाव, अंबाझरी, लेंडी आदी तलावांच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्र शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. तलावांचे सौंदर्यीकरण होणार असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे.गडकरींचे जल्लोषात स्वागत केंद्र शासनाने अवघ्या ४५ दिवसात शहरातील विविध विकास प्रकल्पांना चालना देणारे निर्णय घेतल्यानिमित्ताने भाजपचे पदाधिकारी व शहरातील नागरिकांनी गडकरी यांचे आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर जल्लोषात स्वागत केले. यावेळी महापौर तथा आमदार अनिल सोले, शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे, उपमहापौर जैतुन्नबी अंसारी, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, माजी महापौर कल्पना पांडे, स्यायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, रमेश शिंगारे, नगरसेवक सतीश होले, बंटी कुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१३ हजार कोटींची विकासगंगा
By admin | Updated: July 13, 2014 00:54 IST