अमरावती : कर्करोगाचे निदान व उपचार करण्यास उपयुक्त अशी जगातील पहिली ‘५-डी’ प्रणाली अमेरिकेतील नामांकित जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात विकसित करून येथील डॉ. निशिकांत देशमुख यांनी अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अमेरिकेतील जे.एच.हॉपकिन्स विद्यापीठातून त्यांनी संगणक विज्ञानामध्ये आचार्य पदवी प्राप्त केली. कर्करोेगाच्या निदानास सहाय्य करणारी ५-डी अल्ट्रासाऊंड प्रणाली विकसित करणे, हा त्यांच्या संशोधनाचा एक भाग होता.त्यांनी विकसित केलेली अल्ट्रासाऊंड प्रणाली कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या ट्युमरचे निदान व उपचार करण्यासाठी शल्यचिकित्सकांना नवी दृष्टी प्रदान करणार आहे. कर्करोगाच्या निदानात शल्यचिकित्सक सध्या प्रामुख्याने अल्ट्रासाऊंड - २ डी प्रणालीचा वापर करतात. मोजक्याच रुग्णालयांत अत्याधुनिक ३-डी संगणक ग्राफिक्सचा वापर करण्यात येतो. निशिकांत देशमुख यांनी ३-डी अल्ट्रासाऊंड-बी पद्धती व ३-डी अल्ट्रासाऊंड इलेक्ट्रोग्राफी व्हॉल्युमेट्रिक डाटा एकत्र करून त्याचा प्रभावी वापर करून ५-डी प्रणाली विकसित केली आहे.या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राफिक प्रोसेसिंग युनिटचा ६० ते ७० चौकटी प्रतिसेकंद असा वापर करून इलेक्ट्रोग्राफी निर्माण करता येणे शक्य आहे.मूळचे शिराळा येथील रहिवासी निशिकांत देशमुख हे सद्यस्थितीत अमेरिकेतील सिस्को या संगणकाचे भाग विकसित व तयार करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
कर्करोग निदानासाठी ‘५-डी’ प्रणाली विकसित
By admin | Updated: April 19, 2017 02:42 IST