मुंबई : अंधेरीत गुरुवारी एका तीन वर्षीय चिमुरडीचा डेंगीने बळी घेतला आहे. होली स्पिरिट रुग्णालयात दाखल झालेल्या मनस्वी देवरुखकर या मुलीचा बळी गेला असून, हा अकरावा बळी आहे.परळ येथील के.ई.एम. रुग्णालयातील आणखी दोन डॉक्टरांना डेंगीची बाधा झाली असून, रुग्णालयातील डेंगीबाधित डॉक्टरांची संख्या सहावर पोहचली आहे. गुरुवारी कार्डिओलॉजी विभागातील डॉ. रशीद चव्हाण आणि डॉ. धीरज मयेकर यांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी गुरुवारी के.ई.एम. रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला सर्तकेचे आदेश दिले आहेत. डेंगीमुळे ठाणे जिल्ह्यातील पाच शहरे धोकादायक ठाणे जिल्ह्यात डेंगी झपाट्याने पसरत आहे. यामुळे ठाणे शहरासह मीरा-भार्इंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली पालिकेचा काही भाग, भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसर तर मुरबाड आदी ठिकाणी डेंगीची लागण झालेल्या रुग्णांसह संशयित मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने या शहरांना अतिधोकादायक म्हणून घोषित करून शासनाचे लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी)
अंधेरीत डेंगीने चिमुरडीचा मृत्यू
By admin | Updated: November 7, 2014 05:06 IST